मराठा आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने जवळपास अडीच महिने रखडलेली अकरावीची प्रवेशप्रक्रिया अखेर गुरुवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. पहिल्या फेरीतील प्रवेश कायम ठेवण्यात येणार असून, दुसरी फेरी सुरू करण्यात येईल. या फेरीत सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे.

अकरावी प्रवेशाची पहिली फेरी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम निर्माण झाला आणि प्रवेशप्रक्रिया ठप्प झाली. निम्मे शैक्षणिक वर्ष संपले तरी प्रवेश प्रक्रिया रखडल्याने पालक आणि विद्यार्थी हवालदिल झाले. अखेर या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, पुन्हा प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

अकरावी प्रवेशाबाबतच्या याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सरकारला बुधवारी भूमिका मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी गुरुवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने बुधवारी न्यायालयात सांगितले. पहिल्या फेरीतील प्रवेश कायम ठेवण्यात येणार आहेत. दुसरी प्रवेश यादी ५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. राज्याच्या महाधिवक्त्यांनी दिलेला कायदेशीर अभिप्राय विचारात घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. हा निर्णय राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी दाखल केलेल्या विशेष याचिकेच्या निर्णयाच्या अधीन असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अकरावीच्या पहिल्या प्रवेश फेरीत सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गातील म्हणजे मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात आले होते. ते प्रवेश कायम ठेवण्यात येणार आहेत. दुसऱ्या प्रवेश फेरीपासून मराठा विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश देण्यात येईल. त्यासाठी अर्जात एसईबीसी प्रवर्ग निवडलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात सुधारणा करता येईल.

प्रक्रिया अशी..

* २६ नोव्हेंबर, सकाळी १० : दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल.

* २६ नोव्हेंबर, सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ डिसेंबर : एसईबीसी विद्यार्थ्यांना अर्जातील प्रवर्ग बदलता येईल. नियमित विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीसाठी अर्जाचा भाग २ (महाविद्यालयांचे पसंतीक्रम) भरता येईल. प्रवेश प्रक्रियेत नव्याने सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग १ (वैयक्तिक माहिती) आणि भाग २ भरता येईल.

* २ डिसेंबर : अर्जाचा भाग १ अंतिम करणे आणि पसंतीक्रम भरण्यास अंतिम मुदत

* ५ डिसेंबर, सकाळी ११ : दुसरी प्रवेश यादी जाहीर होईल.

* ५ डिसेंबर : सकाळी ११.३० ते ९ डिसेंबर सायंकाळी ५ पर्यंत : दुसऱ्या प्रवेश यादीनुसार शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश निश्चित

* १० डिसेंबर, सकाळी १० – तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल.

* तिसऱ्या फेरीचे आणि विशेष फेरीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

हे लक्षात ठेवा

*  पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरीत सामावून घेण्यात येणार नाही.

*  प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पुढील नियमित फेरीत सामावून घेण्यात येणार नाही.

*  या विद्यार्थ्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल.

आकडे असे..

*  आलेले अर्ज (ऑफलाइन आणि ऑनलाइन प्रक्रिया मिळून) : १४ लाख ३१ हजार ४८३

*  निश्चित झालेले प्रवेश : ११ लाख ५१ हजार ९८५

*  रखडलेले प्रवेश :२ लाख ७९ हजार ४९८

इतर अभ्यासक्रमांतील प्रवेशही सुरू

अकरावीप्रमाणेच व्यवस्थापन पदव्युत्तर (एमबीए, एमएमएस), वास्तुकला (बी.आर्च) यांसह इतरही व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. एमबीए प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होऊन सहा महिने झाले तरीही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. वास्तुकला अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे. अकरावीसह सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वच अभ्यासक्रमांसाठी ९ सप्टेंबरनंतर सुरू होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांना खुल्या गटात सामावून घेण्यात यावे, असे आदेश शासनाने दिले आहेत.