पहिली गुणवत्ता यादी ४ जुलै रोजी जाहीर होणार

मुंबई : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया शनिवारपासून सुरू होत असून अर्ज भरण्यासाठी बुधवापर्यंत (२६ जून) मुदत देण्यात आली आहे. पहिली गुणवत्ता यादी ४ जुलै रोजी जाहीर होणार आहे.

राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल जाहीर झाल्यापासून प्रतीक्षेत असलेल्या वैद्यकीय प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अखेर शनिवारपासून (२१ जून) सुरू होणार आहेत. प्रवेश अर्ज भरणे, प्रवेश शुल्क भरणे यासाठी २६ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांची यादी २६ जून रोजी रात्री १० वाजता जाहीर करण्यात येईल. त्यानंतर २९ जून ते ४ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देता येतील. प्राथमिक गुणवत्ता यादी ४ जुलै सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल, तर  पहिली प्रवेश यादी ५ जुलै रोजी रात्री ८ नंतर जाहीर करण्यात येईल. मिळालेल्या महाविद्यालयात १२ जुलै रोजी प्रवेश घ्यायचा आहे तर १ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत.

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी जागा

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यावरून वाद निर्माण झाला. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देताना अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याचे मूळ कायद्यानुसार अभिप्रेत आहे. मात्र, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अतिरिक्त जागा न देताच खुल्या गटासाठी उपलब्ध जागांमधून प्रवेश देण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवण्याची वेळ आली. या अनुभवानंतर पदवी अभ्यासक्रमाबाबत शासन वेळेवर जागे झाले आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ९५० अतिरिक्त जागांना मंजुरी मिळाली आहे. मात्र अद्यापही मराठा विद्यार्थ्यांसाठीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होण्याबाबत संभ्रम आहे. या जागा उपलब्ध व्हाव्यात असा प्रस्ताव राज्यशासनाने केंद्राकडे दिला आहे. मात्र, त्याबाबत केंद्राकडून अजूनही काहीही स्पष्टीकरण आलेले नाही.