|| शैलजा तिवले

मुंबई पालिकेचे ‘नर्सिंग होम्स’ना आदेश

प्रतिनिधी : मुंबईतील करोना मृत्यूंची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यास उपचारांचे प्रयोग न करता तातडीने पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश पालिकेने नर्सिंग होम्सना दिले आहेत.

पालिकेने करोना मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी हाती घेतलेल्या ‘सेव्ह द लाइफ मिशन’अंतर्गत या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृतांच्या संख्येत अजूनही लक्षणीय वाढ दिसते आहे. शहरात एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात ४२५ मत्यू झाले, तर आठवड्याचा मृत्युदर ०.८३ टक्के  होता. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या ४८९ वर गेली असून आठवड्याचा मृत्युदर १.५० टक्क्यांपर्यंत वाढला. नर्सिंग होम्समध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येऊनही अनेकदा त्यांच्यावर तेथेच उपचार केले जातात आणि रुग्ण अतिगंभीर झाल्यानंतर त्यांना पालिका रुग्णालयांमध्ये पाठवले जाते. अशा रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर पालिका रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची सूचना नर्सिंग होम्सना देण्यात आली आहे.

‘नर्सिंग होम्समध्ये रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर उपचारासाठी अतिदक्षता विभाग नसतात किंवा असले तरी खाटांची संख्या मोजकीच असते. तसेच अशा रुग्णांना सेवा देण्याची सुविधा मर्यादित असते. मात्र रुग्णांची प्रकृती अतिगंभीर झाल्यानंतरच नर्सिंग होम्समधून पालिका रुग्णालयात पाठवले जाते. रुग्ण उशिराने दाखल झाल्यामुळे त्याच्यावर योग्य उपचार करण्यासाठी कमी कालावधी मिळतो किंवा अशा रुग्णांची प्रकृती अधिकच खालावलेली असल्याने त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवावे लागते. त्यामुळे रुग्णांची प्रकृती गंभीर होत आहे असा अंदाज आल्यावर नर्सिंग होम्सनी लगेच विभागीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून रुग्णाला पालिका रुग्णालयात दाखल करावे, जेणेकरून रुग्णाला आवश्यक उपचार वेळेवर मिळतील,’ असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

गृह विलगीकरणातील रुग्ण प्राणवायूची पातळी कमी झाली तरी रुग्णालयात वेळेत दाखल होत नाहीत. मृत्यू वाढण्याचे हेही एक कारण आहे. प्रकृती अधिक खालावल्यावर खाटांसाठी धावपळ केली जाते. आता प्राणवायूची सुविधा असलेल्या अनेक खाटा रिक्त आहेत, तेव्हा प्राणवायूची पातळी ९५ च्या खाली गेल्यावर रुग्णांनी घरीच वेळ न काढता तातडीने रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन काकाणी यांनी केले आहे. ‘प्राणवायूची पातळी ९० च्या खाली गेल्यावरदेखील काही रुग्ण खासगी रुग्णालयात खाट देण्याचा हट्ट करतात. पालिका रुग्णालयात खाटा उपलब्ध असूनही दाखल होण्यास तयार होत नाहीत. रुग्णांची संख्या अधिक होती त्या वेळी खासगी रुग्णालयांमध्ये खाट वेळेत मिळणे अवघड होते. खाट उपलब्ध होईपर्यंत रुग्णांची प्रकृती खालावल्याने घरीच मृत्यू झाल्याच्याही काही घटना घडल्या आहेत,’ असे निरीक्षण विभागीय आरोग्य अधिकाऱ्यांनी नोंदवले.

रुग्णालयांना पुन्हा मार्गदर्शन

‘रुग्णसंख्या कमी झाली असली तरी अजूनही अनेक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तेव्हा या रुग्णांना योग्य वेळेत योग्य उपचार देणे आवश्यक आहे. यावर आता सर्वाधिक भर दिला जात असून रुग्णालयांना पुन्हा मार्गदर्शन के ले जात आहे. त्यासाठी विविध ऑनलाइन सत्रे घेतली जात आहेत. उपचाराच्या प्रमाणित पद्धतीचा वापर कसा करावा याबाबत करोना कृती दलातील डॉक्टर त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यामुळे आता पुढील काही आठवड्यांत मृतांची संख्याही कमी होईल,’ असे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

सर्व उपचारांचा भडिमार

मुंबई महानगर प्रदेशातील अनेक छोट्या खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास टोसिलीझुमॅब, रेमडेसिविर, रक्तद्रव उपचार, स्टिरॉइड अशा सर्व उपचार पद्धतींचा मारा एकाच वेळी केला जातो. उपचारांची प्रमाणित पद्धती आता गेल्या वर्षभरात विकसित झालेली आहे. मात्र तरीही अजून पालिकेची उपनगरातील रुग्णालये, खासगी रुग्णालयांमध्ये याचे पालन योग्य रीतीने केले जात नाही, असे मत पालिकेच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केले. ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ या औषधाचा करोनाच्या उपचारात किंवा प्रतिबंधात फायदा होत नाही, असे स्पष्ट करत करोना कृती दलाने प्रमाणित उपचार पद्धतीतून हे औषध काढून टाकल्यानंतरही अनेक खासगी रुग्णालयांमध्ये हे औषध दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.