सडक्या, कीड लागलेल्या डाळीची भेसळ

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना फरसाण, लाडू, मिठाई इत्यादी पदार्थासाठी लागणाऱ्या डाळीत मोठय़ा प्रमाणात सडक्या व कीड लागलेल्या डाळीची भेसळ केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत आढळले आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत डाळीत काही काळे तर नाही ना? याची खात्री करून घेऊनच गृहिणींना फराळाला सुरुवात करावी लागणार आहे.

चणाडाळीचे देशांतर्गत उत्पन्न कमी झाल्याने त्याची मोठी तूट राज्यात जाणवत आहे. दिवाळी काही दिवसांवर आल्याने डाळींची मागणी पाहता परदेशातून तिची मोठय़ा प्रमाणात आयात करण्यात येत आहे. नोव्हेंबर २०१५मध्ये रशियन काबुली चण्याचा साठा इंदूरच्या मे. जवाहरलाल अ‍ॅण्ड सन्स यांनी आयात केला होता. त्यानंतर तो साठा काही दिवस तसाच न्हावा-शेवा या बंदरात पडून होता. त्याचा दर्जा निकृष्ट असून त्याला कीड लागल्याची माहिती मिळाली होती.

रशियन काबुली चणा वर्षभरानंतर दिल्लीतील मे. रामस्वरूप रामनिवास अ‍ॅण्ड सन्स यांनी बाजारात विक्रीसाठी आणून तो मुंबई ठाणे परिसरातील गोदामांत साठवल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने २२ ऑक्टोबरला चार ठिकाणी धाडी टाकल्या.  चौकशीत हा रशियन काबुली चणा नवी मुंबईतील टीसीसी इंडस्ट्रियल येथील मे. पारख फुड्स अ‍ॅण्ड ऑइल्स लि. शिरवणे या ठिकाणी बेसन बनविण्यासाठी पुरवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या ठिकाणाहून ५१.९९ टन प्रक्रिया केलेली डाळ जप्त करण्यात आली.

सर्व साठय़ांचा दिल्लीतील रामस्वरूप रामनिवास अ‍ॅण्ड सन्स यांनीच मे. मुकुल एंटरप्रायझेस यांच्या नावाने पुरवठा केल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे दिवाळी सणानिमित्त बाजारात विक्रीसाठी आलेले अन्नपदार्थ तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

येथे साठे सापडले

मे. रामस्वरूप रामनिवास अ‍ॅण्ड सन्स यांनी भाडेतत्त्वावर सुमारे  ११३. ७ टन साठा नवी मुंबईतील मे. ए. ए. कोल्ड स्टोअरेज अ‍ॅण्ड आइस फॅक्टरी प्रा.लि. तुर्भे यांच्याकडे साठविल्याचे आढळले. तसेच त्याच्या पिशवीवर कोड नंबर, मुदबाह्य़ दिनांक, वजन इत्यादी दर्शवले नव्हते. पिशवीवर फक्त ‘पॅक्ड बाय’ म्हणून दिल्लीचा पत्ता नमूद होता. त्याचे पॅकिंग कोल्ड स्टोअरेजमध्येच होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाण्यातील पथकाने एमआयडीसी पावणे येथून मे. गाला फूड्स प्रा. लि. द्वारा ओम वेअर हाऊस येथून सुमारे ४४. ६ टन तर मे. चिंतामणी एंटरप्रायझेस येथून ७.०८ टन इतका साठा जप्त केला.