दुधात भेसळ झाली आहे का, झाली असल्यास त्यात काय काय मिसळवण्यात आले आहे, त्याचे किती प्रमाण आहे वगैरेची छाननी आता ग्राहकांना घरच्या घरीच करता येणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दुधातील भेसळ शोधून काढू शकणारी विशेष अशी ‘दूधपट्टी’ (मिल्क स्ट्रिप) तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या तीन महिन्यांत ही स्ट्रिप तयार करण्याचे प्रयत्न असून ती सामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध होणार आहे. यापूर्वी संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) याबाबत संशोधन केले आहे.
दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात एफडीएने जोरदार मोहीम उघडली आहे. आतापर्यंत हजारो लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. मात्र, तरीही भेसळयुक्त दुधाचा महापूर अजूनही सुरूच आहे. या पाश्र्वभूमीवर एक पाऊल पुढे जाताना आता एफडीएने दुधातील भेसळ घरबसल्या ओळखता यावी, या दिशेने मिल्क स्ट्रिप तयार करण्याचे ठरविले आहे. एफडीएला स्वत: मोठय़ा प्रमाणात या स्ट्रिप तयार करणे शक्य नसल्यामुळे त्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात कसे करता येईल याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. दूध भेसळयुक्त आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी विविध ठिकाणांहून नमुने अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. त्यानंतरच कारवाई करता येते. तोपर्यंत या कारवाईची कुणकुण लागल्यामुळे भेसळखोर आपला गाशा गुंडाळतात आणि अन्य ठिकाणाहून पुन्हा कार्यरत होतात. हे टाळण्यासाठी घरी येणारे दूध भेसळयुक्त आहे का, याची चाचणी तत्काळ व्हावी यासाठीच खास मिल्क स्ट्रिप बनविण्याचे ठरविण्यात आल्याचे कांबळे म्हणाले. या मिल्क स्ट्रिपमुळे दुधातील स्टार्च, साखर, ग्लुकोज, युरिया, अमोनिअम पदार्थ, भेसळ केलेले दूषित पाणी, मीठ, न्युट्रिलायझर, हायड्रोजन पेरॉक्साईड आदींची भेसळ कळू शकणार आहे. इतकेच नव्हे तर भेसळयुक्त दुधामध्ये डिर्टजटचा अंतर्भाव आहे का, याचीही तपासणी या स्ट्रिपमुळे शक्य होणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

मिल्क स्ट्रिपमुळे नागरिकांना घरबसल्या दुधातील भेसळ ओळखता येणार आहे. येत्या तीन महिन्यांत त्या बाजारात याव्यात असे आमचे प्रयत्न आहेत. या स्ट्रिपचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करण्यासाठी सध्या चार उत्पादकांशी प्राथमिक बोलणी सुरू आहेत.
– डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन