आयएनएस चेन्नई विनाशिकेच्या स्वयंपाकघरात आधुनिक यंत्र

सुमारे ४० नौदल अधिकारी आणि साधारणपणे ३५० नौसैनिक यांना दिवसभर खायला घालायचे तर युद्धनौकेवरचे स्वयंपाकघर; दिवसाचे २४ तास आणि वर्षांचे ३६५ दिवस अव्याहत सुरूच असते. इथे नौसैनिकांना लागणाऱ्या चपात्या ही आजवर कायमची डोकेदुखी होती. कारण कितीही वेगात काम केले तरी त्या कमीच पडत. पण आता मात्र येत्या सोमवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या ‘आयएनएस चेन्नई’ या विनाशिकेने या समस्येवर यशस्वीरित्या मात केली असून तिथे स्वयंपाकघरात तासाला ८०० चपात्या तयार करणारे नवे मशीन सर्व यशस्वी चाचण्यांनंतर स्थानापन्न झाले आहे.

साधारणपणे तुफान पावसात, खवळलेल्या समुद्रामध्ये खराब वातावरणातही युद्धनौकेवर कोणतीही यंत्रणा काम करते की, नाही याची पडताळणी केली जाते. या पडताळणी चाचणीमध्ये युद्धनौकेच्या स्वयंपाकघरातील ही यंत्रणा यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता भविष्यात नव्याने दाखल होणाऱ्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकांवर ही यंत्रणा पाहायला मिळेल. या संदर्भात माहिती देताना युद्धनौकेवरील स्वयंपाकघराचे प्रमुख असलेले कमांडर सिद्धार्थ राणा म्हणाले की, ‘सैन्य पोटावर चालते अशी म्हण पायदळाबाबत वापरली जाते. तसेच नौदलाच्या संदर्भात नौसैनिकांचे मनोबल युद्धनौकेच्या स्वंयपाकघरावर अवलंबून असते, असे म्हटले जाते आणि ते खरेच आहे.

नौदलामध्ये उत्तर भारतातून येणाऱ्या नौसैनिकांचे प्रमाण खूप मोठे आहे. चपात्या हा त्यांच्या खाण्याचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे ही समस्या नौदलाला खूप सतावत होती. या यंत्रणेबरोबरच पीठ मळणारीही नवीन यंत्रणा स्वयंपाकघरात कार्यरत झाली आहे. या यंत्रणेने पूर्वीच्या यंत्रणेच्या केवळ अध्र्याएवढीच जागा व्यापली आहे. त्या उर्वरित जागेमध्ये आता नौदलाने एक गरम पदार्थासाठीचे नवीन बहुपयोगी मशीन बसविले असून त्या यंत्रणेचाही फायदा स्वंयपाकघराला आणि पर्यायाने नौसैनिकांना होईल,  असे सांगण्यात येत आहे.

नौकेवर आनंदीआनंद

युद्धनौकांमध्ये चपात्या वेगात करण्याच्या बाबतीत काही यंत्रणा अस्तित्त्वात होत्या. पीठ मळण्यासाठी विशिष्ट प्रकारची रोलरवर चालणारी यंत्रणा वापरली जायची. मात्र खराब वातावरणात तर सोडाच पण मोठय़ा लाटांनी युद्धनौका हलली तरी त्याचे रोलर अडकायचे आणि मग खूप त्रास सहन करावा लागे. त्या संदर्भात एका अमेरिकन कंपनीशी आम्ही चर्चा करत असतानाच घाटकोपरचे एक उद्योजक पुढे आले. त्यांनी यासाठी एक प्रयोग ठेवण्याची तयारी दर्शवली. ही यंत्रणा त्यांचीच निर्मिती आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार त्यात बदलही करण्यात आले. या यंत्रणेच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याने आता विनाशिकेवर आनंदाचे वातावरण आहे, असे राणा म्हणाले.