महिंद्रा अॅण्ड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा ट्विटवर नेहमीच खूप अॅक्टीव्ह असतात. मात्र ते ट्विटवर इतके अॅक्टीव्ह का आहेत यासंदर्भात त्यांनीच ‘लोकसत्ता अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’च्या एक दिवसीय परिषदेमध्ये खुलासा केला. यामध्ये महिंद्रा यांनी आपण ट्विटरच्या प्रेमात कसे पडलो याबद्दल सांगितले.

ट्विटरवर अॅक्टीव्ह राहण्यासाठी तुम्हाला वेळ कसा मिळतो यासंदरर्भातील प्रश्न ‘लोकसत्ता’चे संपादक गिरिश कुबेर यांनी महिंद्रा यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना महिंद्रा यांनी ट्विटवर येण्यामागील किस्सा सांगितला. ‘२००९ मध्ये आमच्या कंपनीमध्ये काम करणारा एक अमेरिकन युवक माझ्याकडे आला आणि त्याने सर तुम्ही ट्विटवर आहात का असा प्रश्न विचारला. त्यावेळी मी हे ट्विटर काय आहे असं विचारलं. तेव्हा त्याने मला ट्विटरबद्दल सांगितले. मी अकाऊण्ट सुरु केल्यानंतर मी पहिलं ट्विट करण्याआधीच २५० जण मला फॉलो करत होते,’ असे महिंद्रा यांनी सांगितले.

‘ट्विटरवर मी अॅक्टीव्ह असण्याबद्दल अनेकजण मला प्रश्न विचारतात. मात्र मी सांगू इच्छितो की मी एकटा असल्याने ट्विटवर अॅक्टीव्ह आहे असे बिलकूल नाही,’ असं महिंद्रा यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हसू पिकले. ‘नाही खरचं एकटा असल्याने मी ट्विटरवर आहे किंवा मी मित्र शोधतोय असं अजिबात नाहीय. माझे कुटुंब आहे मी त्यांच्याबरोबर वेळ घालतो पण ट्विटरवरही अॅक्टीव्ह आहे,’ असं महिंद्रा सांगतात.

ट्विटरचे महत्व ओळखायला हवे

ट्विटर हे सर्वात दूर्लक्षित व हवे तसे वापरले जात नाही असे मला वाटते असं मत महिंद्रा यांनी व्यक्त केले. यासंदर्भात त्यांनी गुवाहाटीमध्ये घडलेले आणि ट्विटवरुन त्यांच्यापर्यंत पोहचलेले एक प्रकरण सांगितले. ‘आमच्या मम अॅण्ड मी या गुवहाटीमधल्या स्टोअरमधील एका वस्तूचा फोटो मला एका ग्राहकाने ट्विटवरुन पाठवला. या ट्विटमध्ये त्यांनी खरी किंमत खोडून त्याऐवजी अधिक किंमत लावून ती वस्तू विकत असल्याचे माझ्या निदर्शनास आणून दिले. हे ट्विट मी बेंगळुरुमधल्या मम अॅण्ड मी च्या सीईओंना पाठवले आणि फोन करुन नक्की काय प्रकरण असल्याची चौकशी केली. त्यावेळी त्या अधिकाऱ्याने खरच असा प्रकार घडल्याचे मान्य करत त्या फ्रेंचायझिवर कारवाई करण्यात आल्याचे मला सांगितले,’ अशी आठवण महिंद्रा यांनी सांगितली. पुढे बोलताना त्यांनी याच उदाहरणाचा दाखला देत ‘प्रत्येक मोबाइल असणारा माझा एजंट आहे. मी काय बरोबर करतोय मी काय चुकीचं करतोय हे मला ट्विटवर समजतं,’ असं सांगितलं.

‘लोकसत्ता’च्या वतीने ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत राज्याच्या सर्वागीण विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासाची सद्य:स्थिती आणि प्रगतीची दिशा यांचा वेध घेतला जात आहे. या सत्रात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी उपक्रमांचे वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ सहभागी आहेत.

‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत कृषी, पायाभूत सुविधा आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रगतीचा ऊहापोह केला जात आहे. विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ या कार्यक्रमात आपली भूमिका मांडत आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा विकासांची दिशा, महानगरांचे व त्याच्या परिघावरील प्रदेशाचे नियोजन यावर यात विचारमंथन केलं जात आहे.

प्रायोजक..
लोकसत्ता अॅडव्हान्टेज महाराष्ट्र या उपक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, एसआरए, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, म्हाडा यांचे सहकार्य लाभले आहे.