राज्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कृषी, पायाभूत सुविधा आणि उद्योग या मूलभूत क्षेत्रांतील घडामोडींचा आणि प्रगतीचा ऊहापोह करणारा ‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ हा नवा उपक्रम ‘लोकसत्ता’तर्फे हाती घेण्यात येत असून त्याच्या पहिल्या पर्वाचा प्रारंभ विख्यात उद्योजक आनंद महिंद्र यांच्या उपस्थितीत सोमवार, २६ ऑगस्ट रोजी होईल.

युवकांमधील वक्तृत्व- नाटय़कलेला उत्तेजन देण्यासह समाजाला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांचा तसेच राजकीय- सामाजिक- आर्थिक प्रक्रियांचा वेध ‘लोकसत्ता’च्या वेगवेगळ्या उपक्रमांतून घेतला जातो. याच परंपरेत ‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ हा उपक्रम सुरू होत असून सोमवार, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या एकदिवसीय परिषदेत कृषी, उद्योग आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांबाबत विचारमंथन होईल.

कृषीविषयक चर्चासत्रात कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, कृषी अर्थतज्ज्ञ प्रदीप आपटे हे मान्यवर सहभाग होतील. पायाभूत सुविधाविषयक चर्चासत्रात मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मेट्रो-३ च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, नियोजनतज्ज्ञ विद्याधर फाटक आदी आपले विचार मांडतील. उद्योगविषयक चर्चासत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, प्रसिद्ध उद्योजक आणि ‘जेनकोव्हल स्ट्रॅटेजिक सव्‍‌र्हिसेस’चे अध्यक्ष दीपक घैसास मार्गदर्शन करतील. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणाने परिषदेचा समारोप होईल.

प्रायोजक : या उपक्रमाला महाराष्ट्र सरकारचा माहिती व जनसंपर्क विभाग, एसआरए, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, म्हाडा यांचे सहकार्य लाभले आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा असल्यास या विषयांतील संबंधितांनी events.loksatta@expressindia.com या ई-मेलवर नावे नोंदवावीत. निवडक  इच्छुकांनाच कार्यक्रमात प्रवेश देण्यात येईल.

मान्यवरांची उपस्थिती..

उद्योजक आनंद महिंद्र यांच्याशी संवाद हे पहिल्या पर्वाचे मुख्य आकर्षण असेल. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध क्षेत्रांतील नामवंत या परिषदेत सहभागी होणार आहेत.