‘भविष्यामध्ये कृषीक्षेत्रामध्ये एककेंद्राभिमुखता म्हणजेच ‘कनव्हर्जन्स’ करण्याची गरज आहे. शेतकरी, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये पार्टनरशीप होणे गरजेचे आहे. आपण प्रत्येक संस्थेला विचारायला हवं तुम्ही किती शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले?. तुम्ही किती लाख शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत आहात? असं आपण सर्वच संस्थाना विचारायला हवं’, असं मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी ‘लोकसत्ता अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या एकदिवसीय परिषदेत व्यक्त केले. ‘तुम्ही किती शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असा सवाल आपण अंबानींना का विचारत नाही?,’ असा सवालही गोयल यांनी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकरी धोरणांबद्दल आपले मत मांडताना गोयल यांनी भविष्यामध्ये केवळ कनव्हर्जन्सचे काम व्हायला हवे असे मत व्यक्त केलं. ‘कृषीक्षेत्रामध्ये एककेंद्रितता येणे गरजेचे आहे. मात्र आपल्याकडील शेतीसंबंधातील मंत्र्यांची संख्या भरपूर आहे. म्हणून आपल्याकडे असलेले सरकार विभागलेले आहे. याच कारणामुळे कृषी क्षेत्रामध्ये एकछत्री अंमलबजावणी करणे कठीण होत आहे,’ असं मत गोयल यांनी मांडले.

‘शेतकरी, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये पार्टनरशीप होणे गरजेचे आहे. हे काम काही सीएसआर अॅक्टीव्हीटी नाही हे कंपन्यांनी लक्षात घ्यायला हवं. हे एक बिझनेस मॉडेल आहे. यामध्ये सर्वांचाच फायदा आहे,’ असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

‘आपण शेतीसंदर्भातील ‘ट्रान्झॅक्शन कॉस्ट’ खूपच वाढवली आहे. आपण इतके तुकडे पाडले आहेत की ग्राहकांना मोजावी लागणारी किंमत आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावात यामुळेच फरक आहे. शेतकरी स्टार्ट-अप निर्माण करणे गरजेचे आहे. एकीकडे शेतकरी दुसरीकडे बाजारपेठ यांच्यात समन्वय साधणारे स्टार्ट-अप अशी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे असे मत गोयल यांनी मांडले.

‘लोकसत्ता’च्या वतीने ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत राज्याच्या सर्वागीण विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासाची सद्य:स्थिती आणि प्रगतीची दिशा यांचा वेध घेतला जात आहे. या सत्रात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी उपक्रमांचे वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ सहभागी आहेत.

‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत कृषी, पायाभूत सुविधा आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रगतीचा ऊहापोह केला जात आहे. विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ या कार्यक्रमात आपली भूमिका मांडत आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा विकासांची दिशा, महानगरांचे व त्याच्या परिघावरील प्रदेशाचे नियोजन यावर यात विचारमंथन केलं जात आहे.

प्रायोजक..
लोकसत्ता अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र या उपक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, एसआरए, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, म्हाडा यांचे सहकार्य लाभले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advantage maharashtra why we dont ask ambanis about how many farmers they have helped scsg
First published on: 26-08-2019 at 12:45 IST