महसूल वाढविण्यासाठी छताची जागा भाडय़ाने देण्याचा ‘एमएमआरडीए’चा निर्णय

मुंबई : चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गाकडे मुंबईकरांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे हा मार्ग तोटय़ात चालत आहे. या पाश्र्वभूमीवर महसूल वाढविण्यासाठी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोनोरेल स्थानकासह मार्गावरील इतर बांधकामाच्या छताची जागा जाहिरातीसाठी भाडय़ाने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नुकतीच एमएमआरडीएने निविदा मागवली आहे.

चेंबूर ते जेकब सर्कलदरम्यानचा १९.५४ कि.मी. लांबीचा संपूर्ण मोनोरेल मार्ग वाहतूक सेवेत दाखल होऊन दोन वर्षे उलटून गेली. पण तरीही या मार्गावरील प्रवासी संख्या वाढताना दिसत नाही. या प्रकल्पाला प्रवाशांचा प्रतिसादच मिळत नसल्याने एमएमआरडीएला दिवसाला लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. एकूणच हा मार्ग तोटय़ात चालला असून या मार्गाला आर्थिक नुकसानातून बाहेर काढण्यासाठी विविध पर्याय एमएमआरडीएकडून पुढे आणले जात आहेत. त्यातूनच आता मोनो स्थानकातील छतासह मार्गावरील इतर ठिकाणच्या बांधकामातील छताची जागा जाहिरातीसाठी भाडय़ाने देण्यात येणार आहे. जेणेकरून यातून काही महसूल एमएमआरडीएला मिळेल, अशी अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे.

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गावर मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)कडून महसूल वाढविण्यासाठी असे अनेकविध पर्याय वापरले जात आहेत. तर जाहिरातीतून त्यांना वर्षांला ४० ते ५० कोटी रुपये महसूल मिळतो. याच धर्तीवर एमएमआरडीएने छताची जागाही आता जाहिरातीसाठी भाडय़ाने देण्याचा निर्णय घेतला आहे.