जाहिरातविषयक धोरणात पालिका तरतूद करणार

मुंबईत ठिकठिकाणी जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या होर्डिगमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी जाहिरात कंपनीवर सोपवून पालिकेने हात झटकले आहेत. या संदर्भात नवे धोरण आखण्यात येत असून त्यात वरील तरतूद करण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी पुणे येथील एक होर्डिग कोसळून अपघात झाला होता. या अपघातात जीवितहानी झाली होती. या दुर्घटनेची दखल घेत मुंबईतील जाहिरातींच्या होर्डिगची दरवर्षी तपासणी करण्याची, तसेच होर्डिगमुळे होणाऱ्या अपघातास संबंधित जाहिरात कंपनीला जबाबदार धरण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली होती. पालिका सभागृहात या संदर्भातील ठरावाची सूचनाही मंजूर करण्यात आली होती.

होर्डिगमुळे अपघात झाल्यास जबाबदारी कुणाची, पालिकेच्या मंजुरीने मुंबईत किती होर्डिग उभारण्यात आले आहेत, ४० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींवर होर्डिग लावण्यापूर्वी इमारतीची संरचनात्मक तपासणी करण्यात येते का, होर्डिगचे लेखापरीक्षण केले जाते का, सिग्नल यंत्रणेच्या आसपास लावण्यात येणाऱ्या होर्डिगविरुद्ध कारवाई करण्यात येते का असे अनेक प्रश्न ठरावाची सूचना मांडताना पालिका सभागृहात उपस्थित करण्यात आले होते.

मुंबईमधील १,२४६ होर्डिगना पालिकेकडून परवानगी देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने या संदर्भात विधी समितीला सादर केलेल्या अभिप्रायात नमूद केली आहे. जुन्या इमारतींवर होर्डिग लावण्याची परवानगी देण्यापूर्वी इमारतीची संरचनात्मक तपासणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच सिग्नल यंत्रणेच्या आसपासच्या होर्डिगबाबत वाहतूक पोलिसांनी तक्रार केल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येते, असेही या अभिप्रायात स्पष्ट करण्यात आले आहे.

जाहिरातींच्या फलकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले असून दरवर्षी मुंबईतील जाहिरातींच्या सुमारे ११ हजारांहून अधिक अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात येते. तसेच काही जाहिरात फलकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली आहे.

जाहिरात फलकांबाबत नवे धोरण आखण्यात येत आहे. या धोरणामध्ये होर्डिगची संपूर्ण जबाबदारी जाहिरात कंपनीवर टाकण्यात येणार आहे. अपघात झाल्यास त्यास जाहिरातदार कंपनी जबाबदार असेल, असेही या अभिप्रायात स्पष्ट करण्यात आले आहे.