आर्थिक चणचणीमुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाला खीळ

निलेश अडसूळ
मुंबई : ऑनलाइन शिक्षणाचे दुसरे वर्ष सुरू झाले तरी अनेक ठिकाणी विद्यार्थी या नव्या प्रणालीत सामावले नसल्याचे दिसत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांचा मतदारसंघ असलेल्या धारावीतच शिक्षणावाचून विद्यार्थ्यांची परवड होत असल्याचे दिसत आहे. काही विद्यार्थ्यांकडे शाळा शुल्क भरायला पैसे नसल्याने शिक्षण थांबले आहे, तर काही ठिकाणी शाळा सुरू असूनही उपकरणे घेण्याची ऐपत नसल्याने शिक्षणाला खीळ बसली आहे.

करोनाकाळातही मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ऑनलाइन शिक्षण देण्याचे प्रयत्न शासन, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुरू आहेत. गेले शैक्षणिक वर्ष पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात, प्रयोग करण्यात सरले. मात्र नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर सलग दुसऱ्या वर्षीही परिस्थिती सुधारल्याचे दिसत नाही. शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघातच अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक समस्या भेडसावत आहेत.

इथल्या बहुतांशी विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारी उपकरणे नाहीत. काहींच्या पालकांकडेही ते नसल्याने शेजारी, जवळ राहणारे नातेवाईक यांच्या स्मार्टफोनवर मुले तासिकांना हजेरी लावतात. काही चाळींमध्ये एकाच वर्गातील चार मुले असतील आणि त्यांच्यापैकी एकाकडे स्मार्ट फोन असेल तर तिथे मुले समूहाने शिक्षण घेतात. ज्यांच्याकडे कोणतेही साधन नाही, अशा विद्यार्थ्यांचे पालक दर काही दिवसांनी शाळेत जाऊन शिक्षकांची भेट घेतात आणि त्यांनी दिलेल्या व्यवसाय, अभ्यास संचाद्वारे मुलांना शिकवतात. ज्या घरांमध्ये पालक शिक्षित नाहीत आणि शाळा शुल्क भरण्यासाठी पैसेही नाहीत, असे विद्यार्थी वर्षभरापासून शाळेतच गेलेले नाहीत.

धारावी फाऊंडेशनच्या माध्यमातून साम्या कोरडे या तरुणीने याबाबत सर्वेक्षण केले. ‘मुलांना शिक्षण नीट मिळते आहे का याची पाहणी करताना लक्षात आले की, कित्येक कुटुंबे गेले वर्षभर संस्थांनी दिलेल्या अन्नपदार्थावरच गुजराण करत आहेत. लघुउद्योग ठप्प झाल्याने घरबसल्या किरकोळ काम करून महिलांना मिळणारे पैसेही बंद झाले आहेत. त्यामुळे पालकांनी शाळांचे शुल्क दिलेले नाही. सलग दोन वर्षांचे शुल्क दिले नसल्याने काही शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात बसू दिले नाही. शुल्क भरण्याची ऐपत नसल्याने आणि उपकरणे नसल्याने मुलांचे शिक्षण थांबणे हा येथील गंभीर प्रश्न आहे, असे साम्या हिने सांगितले. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांना संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

सामाजिक संस्थांचे प्रयत्न ..

‘सेंटर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडिया’ आणि ‘धारावी फाऊंडेशन’ या संस्थांच्या माध्यमातून गरजू मुलांना टॅब वाटप केले जात आहे. सर्वेक्षण केलेल्या विभागातील ५० विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात टॅब दिले असून उर्वरित विद्यार्थ्यांंचे सर्वेक्षण सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत लवकरच ५०० विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहेत.

पालकांच्या आर्थिक स्थितीचा उलगडा

नाईक नगर, राजीव गांधी नगर, भारतीय चाळ या निवडक विभागातील २०० विद्यार्थ्यांंची माहिती गोळा करून त्यांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणी, मासिक उत्पन्न याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार २०० विद्यार्थ्यांपैकी ५० विद्यार्थ्यांंच्या पालकांचे मासिक उत्पन्न ५ हजारांपेक्षा कमी आहे. १०० विद्यार्थ्यांच्या पालकांचे मासिक उत्पन्न हे ७ ते ८ हजार आहे. तर उर्वरित ५० विद्यार्थ्यांंच्या पालकांचे मासिक उत्पन्न १० ते १२ हजारांच्या दरम्यान आहे. यातील बहुतांशी मुलांचे पालक मोलमजुरी, घरकाम, रोजंदारी करतात. काही विद्यार्थ्यांना एकच पालक आहेत. त्यामुळे घरभाडे, उपजीविका, आरोग्यविषयक अडचणी यातून शिक्षणासाठी पुरेसे पैसेच त्यांच्या गाठीला उरत नाही.

इंटरनेटच्या अडचणी, उपकरण नसणे आणि इतर अडचणींसंदर्भात माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. मुंबईतील सर्व शाळांमधून ही माहिती मिळवून त्यानुसार प्रश्न सोडवले जातील. सध्या काही संस्थांच्या माध्यमातून २३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना डेटा कार्ड पुरवले आहेत. पुढेही माहिती घेऊन ते केले जाईल. उपकरणाच्या संदर्भात अशीच माहिती घेऊन त्याची व्यवस्था केली जाईल.

– महेश पालकर, शिक्षणाधिकारी,  महापालिका