मुंबईत अलीकडे अमली पदार्थाची तस्करी चांगलीच वाढल्याचे दिसते. जी चित्रपटात दिसायची म्हणूनच केवळ जिला अभिनेत्री असे म्हटले जाते त्या ममता कुलकर्णीसारखीचे नाव या तस्करीत येत आहे. पोलिसांनी तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. आईस, एमडी अशी चित्रविचित्र नावे असलेल्या या पदार्थाच्या आहारी येथील तरुणाई चालली आहे. पण मुंबईतले हे आजचेच चित्र नाही. हा रोग जुनाच आहे.

इतिहास सांगतो, की तिकडे प्रामुख्याने उत्तर भारतात सैनिक आणि संस्थानिक इंग्रज सत्तेविरोधात बंड करीत असताना, या शहरातील कित्येक तरुण अफूच्या तारेत तर्राट झाले होते. ‘मुंबईचे वर्णन’कार सांगतात की त्या काळात येथे प्रतिवर्षी कोटय़वधी रुपयांचा अफिणीचा व्यापार होत होता. अफू विक्रीची सरकारमान्य अशी ४१ दुकाने शहरात होती. या शिवाय रस्तोरस्ती अफीण ओढण्याची दुकाने होती. चिनी लोक ती चालवायचे. त्यांना म्हणत चंडोलखाने.

चंडोल म्हणजे अफिणीच्या गोळ्या. त्या चिलमीत घालून ओढत. या दुकानांचे मोठे प्रत्ययकारी वर्णन ‘मुंबईचे वर्णन’मध्ये येते. – ‘ह्या चिलमींत विस्तव घालत नाहींत, परंतु तुपांत भिजिवलेला कांकडा पेटवून डाव्या हातांत घेतात आणि त्या चिलमीवर जी गोळी ठेवलेली असते तीस लावून मोठय़ानें झुरका घेतात. चंडोल पितेवेळीं आडवें पडावें लागतें, म्हणून ह्या जाग्यांत जिकडे तिकडे आबड धोबड बांक, खाटा व चोपाया घातलेल्या असतात. आणि जाडय़ा भरडय़ा हांतऱ्या घालून त्यांवर, मुसलमान, ब्राह्मण, परभू, शेणवी, सोनार, भाटय़े, असे अठरापगड जातीचे चंडोलउपासक हातपाय ताणून पडलेले असतात.’

कसे असते तिथले चित्र?

‘कोणी डोळे वटारिलेले असतात, कोणी ओकतात, कोणाच्या तोंडावर माशा बसलेल्या असतात, कोणी खोकतात, कोणी तोंड वेडेंवाकडें करितात, कोणी उसाची गंडेरी चोखितात, कोणी सिताफळाच्या बिया तोंडांत घालितात, कोणी केळीं खातात, कोणी घेरी येऊन पडले आहेत असें दृष्टीस पडतें.. आणि जे लोक या कैफाच्या स्वाधीन झालेले असतात ते निस्तेज व भयंकर दिसतात. पंधरा सोळा वर्षांच्या वयाच्या भरज्वानींत आलेला मुलगा वर्ष सहा महिने चंडोल ओढायास लागला म्हणजे त्याची अवस्था जरत्कारू सारिखी होत्ये.’

हे सांगून झाल्यावर लेखक गोविंद माडगांवकर लिहितात – इंग्रज सरकार याचा काहीं बंदोबस्त करील तर बरें.

पण सरकार बंदोबस्त करणार तरी कसा?

या व्यापारात मोठा आर्थिक व्यवहार होता. एकतर त्यावर त्याकाळी सट्टा चाले. माडगांवकर सांगतात, ‘अफिणीचा सट्टा करणारे मारवाडी, वाणी, पारशी असे पुष्कळ व्यापारी आहेत. व प्रतिदिवशी यांत ते लाखो रुपये कमावितात व गमावितात.’ येथून चीनला मोठय़ा प्रमाणावर अफू निर्यात होत असे आणि त्याच्या जकातीचे लाखो रुपयांचे उत्पन्न इंग्रज सत्तेला मिळत असे. अफूचा बंदोबस्त करून सरकारने या उत्पन्नावर पाणी सोडावे असे कोणास कितीही वाटले, तरी ब्रिटिश सत्ता ते करणे शक्यच नव्हते.’

अफूच्या या व्यापारावरून तर ब्रिटिशांनी चीनशी दोन युद्धे केली होती. अफूचे युद्ध म्हणून ती प्रसिद्ध आहेत. ब्रिटिशांच्या अफूने चीन व्यसनी बनला होता. मुंबईतील चिनी दुकानदारांबद्दल माडगांवकर सांगतात, ते ‘अफीण खाण्यांत प्रवीण व मोठ मोठे कैफ करून पचविण्यास समर्थ तेच असतात.’ नशीब मुंबईचे की एवढे चंडोलखाने असून आणि सरकारचा त्यांना असा पाठिंबा असूनही, याबाबतीत तरी मुंबईचे शांघाय वगैरे झाले नाही.