अंबरनाथ येथील बबन वडापाव सेंटरमध्ये पाल आढळल्याची घटना ताजी असतानाच आता बदलापुरात वडापावमध्ये मृत पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बदलापूरच्या ‘ओम साई खिडकी वडापाव’ सेंटरमध्ये पाल आढळल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून हे वडापाव केंद्र बंद करण्यात आल्याची माहिती आहे.

बदलापूर पश्चिमेला असलेल्या ओम साई स्नॅक्स कॉर्नर वडापाव सेंटरमधील वडापावमध्ये पाल आढळल्याचा मेसेज मंगळवारी सकाळपासून व्हायरल होत होता. वडापावमध्ये मृत पाल आढळल्याचा व्हीडिओही सोशल मिडीयावर फिरत होता. मात्र या फोटो आणि व्हिडीओबाबत नागरिकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तेथे पंचनामा केल्यानंतर तेथील मालकाचा मुलगा शैलेश चौधरी याने या वडापाव मध्ये पाल आढळल्याचे मान्य केले आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे देखील याबाबत तक्रार करण्यात आली आहे.

मात्र, अंबरनाथनंतर बदलापुरातही वडापावमध्ये पाल आढळल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. दोन ठिकाणी पाली आढळल्याने नेमके या प्रकरणातील सत्य शोधून काढण्याची मागणी होत आहे.