बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांची गैरसोय झाल्यानंतर पुढच्या महिन्यात मुंबईकरांना आणखी एका संपाला सामोरे जावे लागू शकते. बेस्टच्या परिवहन विभागाने पुकारलेल्या संपात कामगारांचे नेतृत्व करणारे शशांक राव यांनी आता पालिका कर्मचाऱ्यांच्या संपाचे संकेत दिले आहेत. बेस्टप्रमाणे मुंबई महापालिकेतही शशांक राव यांची मोठी युनियन आहे.

त्यामुळे पाालिका कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर मुंबईकरांची मोठी गैरसोय होऊ शकते. बेस्टचा संप शशांक राव यांनी ज्याप्रकारे हाताळला ते पाहता पालिका कर्मचारीही संप पुकारण्यासाठी शशांक राव यांना कौल देऊ शकतात.

मुंबई महापालिकेत मागच्या पाच वर्षांपासून वेतन करार झालेला नाही. त्यासाठी संप पुकारायचा का ? त्यासंबंधी फेब्रुवारीत कामगाराचे मतदान घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले. त्यामुळे पुढच्या महिन्यात पालिका कर्मचारी संपावर जाऊ शकतात. शशांक राव दिवंगत कामगार नेते शरद राव यांचे सुपूत्र आहेत.