काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मालाड परिसरात महिला आणि तिचा लहान मुलगा कारमध्येच बसले असताना वाहतूक पोलिसांकडून त्यांची गाडी उचलून नेण्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. सुरूवातीला ही गोष्ट समोर आल्यानंतर वाहतूक पोलिसांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, काही दिवसांतच या घटनेची दुसरी बाजू दाखवणारा व्हिडिओ समोर आला. यामध्ये संबंधित महिलेची चूक असल्याचेही स्पष्ट झाले.

त्यामुळे भविष्यात असा कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी वाहतूक विभागाकडून टोईंगबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये अनेक नव्या नियमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. एखादे वाहन उचलत असताना त्या वाहनाचा मालक तेथे आल्यास दंडाची रक्कम आणि टोईंग शुल्क आकारून ते वाहन सोडण्यात यावे. तसेच गाडी टो करण्यापूर्वी ध्वनीक्षेपकावरुन गाडी काढण्यासाठी एकदा सूचनाही देण्यात येणार आहे. याशिवाय, एखादी गाडी नो-पार्किंग क्षेत्रात उभी असेल, पण गाडीचा चालक आतमध्ये बसला असेल तर ती गाडी उचलू नये. तसेच या गाड्या उचलण्यासाठी पोलिसांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संबंधित वाहनाच्या मालकाशी गैरवर्तन किंवा उद्धटपणे वागू नये, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

जप्त दुचाकी सोडविण्यासाठी दमछाक

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसह अन्य शहरांमध्ये टोईंगवाल्यांच्या मुजोरीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक टोईंगच्या गाडीसोबत पोलिस उपनिरिक्षक दर्जाचा अधिकारीही तैनात करण्यात येईल. या अधिकाऱ्याने सांगितल्यानंतरच वाहन उचलले जाईल. तसेच प्रत्येक टोईंग व्हॅनमध्ये ई-चलान मशिन, मेगाफोन आणि वॉकी-टॉकी ही उपकरणे ठेवण्याच्या सूचना वाहतूक विभागाने दिल्या आहेत.

Video: कार टोईंग प्रकरणात बाळाची आईदेखील दोषी?