पाळीव मांजराचा मृत्यू झाल्यानंतर खार येथे रहाणाऱ्या रहिवाशाने दोन वेटरनरी डॉक्टर विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हे मांजर पर्शियन प्रजातीचे होते. शीबा हसन यांच्या सुल्तान या मांजरीचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला. वेटरनरी डॉक्टरनी योग्य ती काळजी न घेतल्यामुळे आपल्या मांजरीचा मृत्यू झाला असा आरोप शीबा यांनी केला आहे.

शीबा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत डॉ. हितेश स्वाली आणि डॉ. कस्तुरी भडसावळे या दोघांचे नाव घेतले आहे. दोन्ही डॉक्टरांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. सुल्तानच्या डोळयावर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे असे डॉ. स्वाली यांनी आम्हाला सांगितले व डॉ. भडसावळेंकडे पाठवले. शस्त्रक्रिया केली नाही तर सुल्तानची नजर जाऊ शकते असे डॉ. भडसावळे यांनी सांगितल्याचे हसन म्हणाल्या.

चर्चगेट येथील क्लिनिकमध्ये सुल्तानवर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यासाठी ३६ हजार रुपये भरले. शस्त्रक्रियेनंतर योग्य ती काळजी न घेतल्यामुळे सुल्तानचा ऑगस्ट महिन्यात मृत्यू झाला असा आरोप शीबा हसन यांनी केला. शस्त्रक्रियेनंतर किडनीची स्थिती दर्शवणाऱ्या सीरम क्रिएटाईनचे प्रमाण जास्त वाढले होते. शस्त्रक्रियेनंतर सुल्तानने खाणे-पिणे सोडले व तो दुर्बल झाला होता असे शीबा हसन यांनी सांगितले.

या कुटुंबाने केंद्रीय मंत्री मनेका गांधींशी संबंधित असलेल्या एनजीओला पत्र लिहिले. मनेका गांधी यांनी आम्हाला तक्रार दाखल करायला सांगितली. त्यामुळे आम्ही वेटरनरी काऊंसिल ऑफ इंडियालाही पत्र लिहून तक्रार केली आहे असे  हसन म्हणाल्या. सुल्तानच्या मृत्यूनंतर आमचे संपूर्ण कुटुंब दु:खामध्ये बुडाले आहे. सुल्तान आमच्यासाठी कुटुंबातील लहान मुलाप्रमाणे होता. आम्हाला आर्थिक नुकसानभरपाई नकोय तर आम्हाला न्याय हवा आहे असे शीबा हसन म्हणाल्या.