करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानं मुंबईतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत असून, शहरातील कंटेनमेंट झोनची संख्याही मोठी आहे. करोना रुग्ण आढळून आलेल्या अनेक बिल्डिंग सील करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, करोना रुग्ण आढळून येणाऱ्या बिल्डिंग सील करण्याच्या नियमात बृह्नमुंबई महापालिकेनं मोठा बदल केला आहे. आता तीन पेक्षा अधिक करोना रुग्ण आढळून आल्यानंतरच पूर्ण इमारत सील केली जाणार आहे.

मुंबईत करोनानं शिरकाव केल्यानंतर त्याचा प्रसारही झपाट्यानं झाला. सुरूवातील रुग्णसंख्येची वाढ मंद होती. मात्र, नंतरच्या काळात रुग्णसंख्येचा वेग प्रचंड वाढल्याचं दररोज येणाऱ्या आकडेवारीतून समोर आलं होतं. सध्या मुंबईतील एकूण करोना रुग्णांची संख्या एक लाख ८८२ एवढी असून ८४,५७० रुग्ण बरे झाले आहेत तर केवळ १९,९९० रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

दरम्यान, मुंबई महापालिकेनं करोना रुग्ण आढळून येणाऱ्या बिल्डिंग सील करण्याच्या नियमात बदल केला आहे. “एका बिल्डिंगमध्ये जर तीन किंवा त्यापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून आले, तर महापालिका प्रशासनाकडून संपूर्ण बिल्डिंग सील केली जाईल. तीन पेक्षा कमी रुग्ण असतील, तर महापालिका अधिकाऱ्यांकडून संबंधित मजला सील केला जाईल. बिल्डिंगमधील इतर रहिवाशांवर बाहेर ये-जा करण्यावर कसलीही बंधन असणार नाही,” अशी माहिती महापालिकेच्या आर दक्षिण वार्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई महापालिकेनं पश्चिम उपनगरात एक रुग्ण आढळून आलेल्या बिल्डिंगही सील करण्याचा निर्णय घेतला होता. मागील आठवड्यात घेण्यात आलेल्या या निर्णयाला नागरिकांना आक्षेप घेतला होता. एक रुग्ण आढळून आलेल्या बिल्डिंगमधील रहिवाशांच्या हालचालींवर १४ दिवसांसाठी निर्बंध घालण्याला नागरिकांनी विरोध केला होता. त्यानंतर महापालिकेकडून नियमात बदल करण्यात आला आहे.