दहा-दहा मीटर उंचीच्या लाटा, कधी हाडे गोठवणारी थंडी, तर कधी प्रखर ऊन आणि नजर जाईल तेथपर्यंत फक्त पाणीच पाणी.. अशा वातावरणात शिडाच्या बोटीवर असलेला एकटा अभिलाष. एक-दोन नव्हे तर तब्बल १५७ दिवस सागरावर स्वार होऊन पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा अभिलाष आज, शनिवारी मुंबईच्या किनाऱ्यावर दाखल होत आहे.
प्रशांत, अटलांटिक आणि हिंदी असे तीन महासागर, केप ल्युविन, केप हॉर्न आणि केप ऑफ गुड होप हे तीनही केप असा जवळपास २३ हजार सागरी मैलांचा प्रवास करीत येत असलेल्या अभिलाषचे पाय जवळपास पाच महिन्यांनी पहिल्यांदा जमिनीला लागणार आहेत. पृथ्वीची सागरी प्रदक्षिणा करणाऱ्या अभिलाषचे म्हादेई या बोटीसह स्वागत करण्यासाठी गेट वे ऑफ इंडियावर नौदलाचा वाद्यवृंद सज्ज आहेच; पण राष्ट्रपती प्रणव मुखर्जीदेखील त्याच्या स्वागताला उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी दुपारी २.३० वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे एका शानदार समारंभात त्याचे स्वागत केले जाणार आहे. २००९ मध्ये भारतीय नौदलातील कमांडर दिलीप दोंदे यांनी शिडाच्या होडीतून चार थांबे घेत जगप्रदक्षिणा पूर्ण केली होती. अभिलाषने मात्र त्याच्या या सागर परिक्रमेत कुठेही जमिनीवर पाऊल ठेवलेले नाही. अशा प्रकारचा विक्रम करणारा तो पहिलाच भारतीय असेल, तर जागतिक क्रमवारीत ७९ वा साहसवीर. नौदलात रेकोनन्स पायलट असणाऱ्या लेफ्टनंट कमांडर अभिलाषने १ नोव्हेंबर २०१२ रोजी या महत्त्वाकांक्षी सागर परिक्रमेची गेट वे ऑफ इंडिया येथून सुरुवात केली होती.