सखल भागांत पाणी; नाले, गटारांच्या सफाईवर प्रश्नचिन्ह

मुंबई : ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यातून बुधवारी मुंबई बचावली असली तरी गुरुवारी सकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने महापालिके च्या पावसाळापूर्व तयारीचे वाभाडे काढाले. मुंबईतील शीव, किंग्ज सर्कल, हिंदमाता यासह काहीसखलभागात पाणी साचले. पालिकेने युद्धपातळीवर पंप सुरू करुन साचलेल्या पाण्याचा झटपट निचरा केला. असे असले तरी पालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या नाले, गटाराच्या साफसफाईवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

‘निसर्ग’ चक्रीवादळ मुंबईत धडकलेच नाही. मात्र सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसाने बुधवारचा दिवस गाजवला. मुंबईत गुरुवारी पावसाने ताल धरला आणि अधूनमधून पावसाच्या मुसळधार सरी कोसळू लागल्याने मुंबईकर पुन्हा धास्तावले. मुसळधार पावसाने शीव, किंग्ज सर्कल, हिंदमाता यासह काही ठिकाणच्या सखलभागांमध्ये पाणी साचू लागले. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. पाणी साचलेल्या ठिकाणचे पंप तात्काळ कार्यान्वित करण्यात आले आणि पाण्याचा झटपट निचरा करुन रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले.

सकाळी कोसळलेल्या पावसाने दुपारनंतर घेतलेली विश्रांती पथ्यावर पडली. सकाळी कोसळून गेलेला पाऊन आणि त्यानंतर झालेले ढगाळ वातावरण यामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला होता. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीने हैराण झालेले मुंबईकर गारव्याने सुखावले होते. मात्र दुपारी ४ नंतर पुन्हा कडक उन पडले होते.

‘प्रशासनाला जाब विचारणार’

मुंबईमधील नदी, नाले आणि गटारांच्या साफसफाईसाठी स्थायी समितीने कोटय़वधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले. एकीकडे करोनाची लढाई सुरू असताना दुसरीकडे नालेसफाईची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे दावे प्रशासनाकडून करण्यात येत होते. नदी, नाले, गटारे साफ करण्यात आले होते, मग अर्ध्या-एक तास पडलेल्या पावसामुळे पाणी साचले कसे, असा सवाल पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. मुंबईच्या सफाईत पुन्हा एकदा प्रशासन नापास झाले आहे. त्यामुळे याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला जाब विचारण्यात येईल, असा इशारा रवी राजा यांनी दिला आहे.

सायन, चेंबूर बस सेवेवर परिणाम

बेस्टला माहिम, सायन, चेंबूर, वडाळा भागांत साचलेल्या पाण्यामुळे बेस्टला काही फे ऱ्या अन्य मार्गाने वळवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. सायनमार्गे अप व डाऊनला जाणाऱ्या ३३ बस फे ऱ्या भाऊ दाजी लाड मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्र माने दिली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा प्रवास लांबला. सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसामुळे चालकांना बस चालवताना कसरत करावी लागली. दुपारी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरू लागले आणि सायन, चेंबूर मार्गावरील बस सेवा पुर्ववत झाली.

ढगाळ आकाश

कुलाबा येथे गुरुवारी सकाळी ८.३० वाजता ५० मि.मी., तर सायंकाळी ५.३० च्या सुमारास ४९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे सकाळी ८.३० वाजता २४.८ मि.मी., तर सायंकाळी ५.३० वाजता ४७ मि.मी पावसाची नोंद झाली. कुलाबा वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सर्वसाधारणत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

येथे पाणी साचले

गांधी मार्केट, शीव रोड नंबर २४, हिंदमाता, दादर टीटी, षण्मुखानंद हॉल – माटुंगा, मुंबई पोर्ट ट्रस्ट कॉलनी – अ‍ॅन्टॉप हिल, एसआयईएस कॉलेज-मुलुंड, मानखुर्द रेल्वे स्थानक.

७० झाडे उन्मळून पडली

पावसाच्या तडाख्यात गुरुवारी शहरात २९, पूर्व उपनगरात २१, तर पश्चिम उपनगरात २० अशी एकूण ७० झाडे उन्मळून पडली.