सुरक्षा परीक्षणासाठी संघटनेतर्फे उपहारगृहांना सूचना
कुल्र्यात हॉटेलमध्ये झालेल्या सिलिंडर स्फोटानंतर हॉटेल सुरक्षेच्या चिंधडय़ा झाल्याचे वास्तव समोर येताच मुंबई महापलिका आयुक्त अजय मेहता यांनी शहरातील दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील हॉटेलांचे भौतिक सर्वेक्षण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे कारवाईच्या भीतीने हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत. यावर आहार संघटनेने एक पत्रक काढले असून १२ हजार हॉटेल चालकांना तातडीने सुरक्षा परीक्षण करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार सध्या शहरात दुसऱ्या श्रेणीतील ३५०, तर तिसऱ्या श्रेणीतील ३ हजार ८८० हॉटेल्स आहेत. शहरांतील लाखो चाकरमान्यांना भूक भागविण्यासाठी दिवसातून एकदा तरी अशा हॉटेल्सचा आधार घ्यावा लागतो. हॉटेलात खाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने गेल्या काही वर्षांत अनेक हॉटेल चालकांनी अनधिकृत पोटमाळे बांधले असल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र बेकादेशीर बांधण्यात आलेल्या बांधकामाकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे कुर्ला स्फोटानंतर समोर आले आहे. या पाश्र्वभूमीवर पालिका आयुक्तांनी शहरातील हॉटेलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. यात तीन अधिकारी मिळून दिवसाला दहा हॉटेलांची तपासणी करणार आहेत. यात आग सुरक्षा नियम पाळले जात आहेत का? आरखडय़ानुसार जागेबाबत नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे का? याची तपासणी करणार आहेत. यात हॉटेल चालकांनी नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्या हॉटेलचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
शनिवारी कुल्र्यात सिलिंडर स्फोटात आठ जण ठार झाले. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी मुंबईसह राज्यभरातील हॉटेल चालकांना हॉटेलचे सुरक्षा ऑडिट करून घेण्याची सूचना पत्रकाद्वारे करण्यात आली असल्याचे आहार संघटनेचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी सांगितले. यापूर्वी असे पत्रक का काढण्यात आले नाही, असे विचारले असता, हॉटेल चालक वर्षभराचे सुरक्षा ऑडिट करीत असतात, मात्र तरीही अपघात होऊ शकतो, असे स्पष्टीकरण शेट्टी यांनी दिले.