News Flash

अभियंत्यांपाठोपाठ शिक्षकही बेरोजगार

ज्यातील बेकार अभियंत्यांमध्ये आता अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्राध्यापकांचीही भर पडणार आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

बंद होणारी महाविद्यालये, बदललेल्या शिक्षक प्रमाणाचा फटका

मुंबई : राज्यातील बेकार अभियंत्यांमध्ये आता अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्राध्यापकांचीही भर पडणार आहे. राज्यातील चाळीस अभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने संमती दिल्यानंतर राज्यातील दहा ते बारा महाविद्यालयांतील चारशे ते साडेचारशे प्राध्यापकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. ही संख्या येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांअभावी राज्यातील चाळीस अभियांत्रिकी महाविद्यालयांना यंदा टाळे लागणार आहे. मुळातच वेतन उशिरा मिळणे, असुविधा यांना तोंड देणाऱ्या प्राध्यापकांवर आता नोकरीच गमावण्याची वेळ आली आहे. बहुतेक महाविद्यालयांनी नव्या, कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या, तात्पुरत्या प्राध्यापकांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील चाळीस महाविद्यालये बंद करण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने परवानगी दिली आहे, त्याचप्रमाणे अनेक महाविद्यालयांची प्रवेश क्षमता कमी करण्यास, तुकडय़ा कमी करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील अभियांत्रिकीचे साधारण चारशे अभ्यासक्रम बंद होत आहेत.

पुणे, मुंबई, वर्धा, सांगली येथील दहा ते बारा महाविद्यालयांनी एकदम पन्नास ते ऐंशी प्राध्यापकांना घरचा रस्ता दाखवल्याचे समोर येत आहे. एका संस्थेने जवळपास ९५ प्राध्यापकांना काढून टाकले आहे. यानुसार राज्यातील साधारणे साडेचारशे प्राध्यापकांना सध्या नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. येत्या काळात ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. या महाविद्यालयांमधील अभ्यासक्रम हे टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत. सध्या पहिल्या वर्षांसाठीचे विषय आणि त्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या प्राध्यापकांना काढून टाकण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जसे अभ्यासक्रम बंद होऊ लागतील तसे पुढील दोन वर्षे अजून काही प्राध्यापकांना काढून टाकावे लागेल, असे एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले.

नवबेरोजगारांना संधी कुठे?

गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयांमध्ये नियमित प्राध्यापक घेण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे सध्या काढून टाकलेल्या प्राध्यापकांमध्ये बहुतेक कंत्राटी, तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केलेले (अ‍ॅड हॉक) प्राध्यापक आहेत. साधारणपणे हा वर्ग ३५ ते ४५ या वयोगटातील आहे. विद्यार्थी संख्येच्या चढ-उतारानुसार दरवर्षीच अनेक प्राध्यापकांना नोकरी गमावण्याची वेळ येते. मात्र यंदा एकगठ्ठा मोठय़ा प्रमाणावर महाविद्यालये बंद झाल्यामुळे प्राध्यापकांचे हे प्रमाण अधिक वाटते. बाकीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचीही सुस्थिती नसल्यामुळे प्राध्यापकांच्या पुढील संधीबाबतही संदिग्धता असल्याचे एका वरिष्ठ प्राध्यापकांनी सांगितले. त्यामुळे वाढणाऱ्या खासगी शिकवण्या, प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग अशा काही माफक संधी असल्या तरी या प्राध्यापकांना नव्याने नोकरीच्या संधी मिळणार का, असाही प्रश्न यातून उपस्थित होत झाला आहे.

‘एआयसीटीई’च्या बदलेल्या निकषांचाही परिणाम

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने यंदा प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात बदल केला. पूर्वी १५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण होते ते येत्या शैक्षणिक वर्षांपासून २० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असे करण्यात आले. त्यानुसार एका तुकडीसाठी १६ शिक्षक लागत होते ते आता १२ शिक्षकच लागणार आहेत. त्यामुळे बहुतेक अभ्यासक्रमांची एक चतुर्थाश शिक्षकसंख्या कमी होणार आहे. महाविद्यालयांमध्ये पुरेसे प्राध्यापक नसल्यामुळे आणि प्राध्यापक मिळत नसल्याच्या संस्थांच्या तक्रारींनतर एआयसीटीईने हे गुणोत्तर बदलले. मात्र त्यामुळे ज्या मोठय़ा महाविद्यालयांमध्ये पुरेसे शिक्षक कार्यरत होते त्यांनाही महाविद्यालयांनी काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. ‘‘शिक्षकांचे वेतन देण्यास अडचणी असलेल्या, विद्यार्थी मिळत नसलेल्या अनेक संस्थांनी यंदा अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आपणहूनच बंद केला आहे. मात्र त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने अभ्यासक्रम सुरू असणाऱ्या काही महाविद्यालयांनीही प्राध्यापकांना काढून टाकण्याचे धोरण स्वीकारले आहे,’’ असे प्राचार्याकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 2:06 am

Web Title: after engineer teachers also become unemployed due to closing colleges
Next Stories
1 युती न झाल्यास एकटे लढून स्वबळावर सत्ता मिळवू
2 आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी आता पालकांच्या उत्पन्नाची अट नाही
3 डीएसके गुंतवणूकदार फसवणूक प्रकरण, आणखी सहा जण संशयित असल्याचा पोलिसांचा दावा
Just Now!
X