News Flash

घरी वडिलांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना ‘त्या’ देत होत्या बारावीचा पेपर

दोन बहिणींना अशाच दु:खद प्रसंगाला सामोरे जावे लागले.

( प्रतिकात्मक छायाचित्र )

दहावी-बारावीची परिक्षा विद्यार्थ्यांच्या करीयरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असते. काही वेळा या परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अत्यंत कठिण परिस्थितीचा सामना करावा लागतो. मुंबईपासून १३३ किलोमीटर अंतरावरील तलासरी येथे राहणाऱ्या दोन बहिणींना अशाच दु:खद प्रसंगाला सामोरे जावे लागले. पूजा आणि दिपिका यांचा मंगळवारी भूगोलाचा पेपर होता. मात्र त्याच दिवशी त्यांचे वडिल विनोद चौधरी (४५) यांचे अचानक निधन झाले.

पेपरला काही तास उरलेले असताना अचानक त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्याही परिस्थितीत या दोन्ही मुलींनी हिम्मत न हरता बारावीचा पेपर दिला. घरी वडिलांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना या दोन्ही मुली पेपर देण्यासाठी परिक्षा केंद्रावर पोहोचल्या. या दोघी बहिणी दापचेरी येथील विनय.पी. पाटील ज्यूनियर कॉलेजमधील कला शाखेच्या विद्यार्थीनी आहेत.

विनोद चौधरी यांचे निधन झाल्याचे कळल्यावर संपूर्ण गाव सांत्वनासाठी त्यांच्या घरी लोटले होते. आलेला प्रत्येकजण या दोन बहिणींना आणि त्यांची आई सरिताला धीर देत होता. विनोद चौधरी यांच्या निधनाची बातमी समजल्यावर कॉलेजचे प्राध्यापक विनोद सोनावणे यांनी तात्काळ मुलीच्या घरी धाव घेतली. त्यांना मुलीच्या शिक्षणाची चिंता होती. त्यांनी कसेबसे समजूत काढून मुलींना परिक्षा देण्यासाठी राजी केले. या दोन मुलींनी शिकून मोठे व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.

आपल्याला शिकून वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे त्यासाठीच या मुली परिक्षा देण्यासाठी तयार झाल्या. आमच्या शिक्षणासाठी वडिलांनी प्रचंड मेहनत केलीय असे पूजाने सांगितले. जेव्हा या मुलींनी परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी घर सोडले तेव्हा त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती. घरापासून परिक्षा केंद्र आठ किलोमीटर अंतरावर होते. कॉलेजचे अधिकारी या मुलींसोबत परिक्षा केंद्रावर गेले. १०.३० वाजता त्या परिक्षा केंद्रावर पोहोचल्या. या दोन्ही मुली हुशार असून त्यांचे वर्ष वाया जाऊ नये अशी इच्छा होती असे प्राध्यापक विनोद सोनावणे यांनी सांगितले. या मुली परिक्षा केंद्रात पेपर लिहित असताना त्यांच्या वडिलांवर अंत्यसंस्कार झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2018 7:02 pm

Web Title: after fathers death sisters gave hsc exam
टॅग : Hsc Exam
Next Stories
1 “मुख्यमंत्र्यांनी भिडे यांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला”
2 …तर कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा विचार: विनोद तावडे
3 भीमा कोरेगावप्रकरणी गुन्हे मागे का घेतले?: माजी पोलीस आयुक्तांची सरकारवर टीका
Just Now!
X