पदवीसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्राधान्य; प्रथम वर्ष प्रवेशाच्या नोंदणीतील निरीक्षण

बारावीच्या निकालानंतर पदवीच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल यंदाही वाणिज्य शाखेकडे आहे. सुमारे एक लाखाहून अधिक विद्यार्थी अर्ज या शाखेतील विविध अभ्यासक्रमांसाठी आले आहेत. यंदा बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्राधान्य दिले असून, व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी ४० हजारांहून अधिक अर्ज आलेले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या आत्तापर्यंतच्या आकडेवारीतून हे स्पष्ट होत आहे. बारावीच्या निकालानंतर पदवीचा अभ्यासक्रम हा करिअरची दिशा ठरवत असतो. ही दिशा ठरविताना विद्यार्थ्यांची तारेवरती कसरत सुरू होते. नोकरीच्या दृष्टीने सोयीस्कर असणारे व्यवस्थापन, माहिती व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आहे. यंदाही विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांची निवड मोठय़ा प्रमाणात केली असल्याचे समोर येत आहे.

वाणिज्य शाखेकडे कल असणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनशास्त्र, बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स, अकाऊंटिंग व फायनान्स या अभ्यासक्रमांसाठी आत्तापर्यंत अधिक प्रवेश अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर कला शाखेतील जवळपास २० हजार विद्यार्थ्यांनी मास मीडियाच्या अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमाची निवड जवळपास ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी केली असल्याचे आकडेवारी सांगते.

पाच वर्षांचा आढावा (२००९-२०१४)

* कला शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या गेल्या पाच वर्षांत घटली असून ३९ हजार ४२ वरून ३४ हजार ४१६ वर आली आहे.

* फाइन आर्ट्सकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. ४८६ वरून २७५ पर्यंत खाली आली आहे.

* वाणिज्य शाखेकडे ओढा वाढत असून १ लाख ७ हजार १८५ विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ७ हजार ८३७ झाली आहे.

* कायद्याच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून ३ हजार ३३९ वरून ५ हजार ४१९ वर गेली आहे

‘आवडीच्या क्षेत्रांना प्राधान्य’

वाणिज्य शाखेतील पदवीचा अभ्यासक्रमाच्या जोडीने सीएसारख्या अभ्यासक्रमांकडे पूर्वी विद्यार्थ्यांचा कल असायचा, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये वाणिज्य शाखेमध्ये फायनान्स, बँकिंग, इन्शुरन्स आदी विशेष विषय घेऊन पदवीचा अभ्यासक्रम करण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसत आहे. त्यामुळे सरसकट सगळा अभ्यासक्रम न घेता आवडीच्या क्षेत्रांचे विषयांना प्राधान्य देऊन पदवीच्या अभ्यासक्रमाची निवड केली जात असल्याचे काही वर्षांमध्ये दिसून येत आहे, असे डहाणूकर महाविद्यालयाच्या प्राचार्य माधवी पेठे यांनी सांगितले.  ‘विज्ञान विषय अवघड वाटल्यामुळे विज्ञान शाखेचे विद्यार्थी फायनान्स, पत्रकारिता आदी क्षेत्रांकडे वळताना दिसत आहेत. संगणक विषयात रस असलेले वाणिज्य शाखेचे विद्यार्थी माहिती व तंत्रज्ञानाची निवड करतात असे दिसून आले आहे,’ असेही त्या म्हणाल्या.

महाविद्यालयांमधील एकूण जागा

२,९६,५७३

वाणिज्य शाखा

१,३९,७३०

कला

५५,८४१

विज्ञान

६१0२०

आतापर्यंतची विद्यार्थ्यांची एकूण ऑनलाइन नोंदणी

१,0८,७९३

एकूण प्रवेशअर्ज

२,६३,१०७