वातानुकूलित लोकल गाडीच्या चाचणीची प्रथा कायमच मोडण्याऱ्या मध्य रेल्वेने आता या गाडीची चाचणी जूननंतर घेण्याचे ठरविले आहे. यात प्रत्यक्ष रुळावरील तब्बल २१ मुख्य चाचण्या घेण्यात येणार आहेत. तसेच कारशेडमधील १६ चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ‘संशोधन आराखडा आणि मानके संघटना’कडून (आरडीएस) पुन्हा एकदा या चाचण्या नव्याने घेतल्या जाणार आहेत. या चाचण्यात वातानुकूलित गाडी यशस्वी झाल्यास ही गाडी प्रत्यक्षात मध्य रेल्वेच्या रुळावर धावणार आहे.
सध्या वातानुकूलित गाडीच्या प्राथमिक चाचण्या कुर्ला कारशेडमध्ये सुरू झाल्या आहेत. यात आतापर्यंत विविध १६ चाचण्यांपकी १२ चाचण्यांत ही गाडी यशस्वी झाली आहे. तर गाडीच्या मुख्य चाचण्या जूननंतरच करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान या गाडीची चाचणी १६ मेपासून ठाणे ते वाशीदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्यात येणार होती. मात्र या लोकलच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी उद्भवल्याने त्या सोडविण्यासाठी संबंधित कंपनीचे कर्मचारी परदेशातून आले असून सॉफ्टवेअरमधील समस्येवर तोडगा काढण्याचे काम सुरू झाले आहे.