‘कराची बेकरी’च्या मुंबईतील खवय्यांसाठी एक वाईट बातमी आहे. संपूर्ण देशभरात शाखा असलेल्या कराची बेकरीने वांद्रेतील शाखा बंद केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाकिस्तानी नावाला विरोध करत कराची बेकरीला इशारा दिला होता. कराची बेकरी हे नाव देशविरोधी असून, नाव बदलण्याची मागणी मनसेचे उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी केली होती. तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर ही शाखा बंद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वप्रथम नोव्हेंबर २०२० मध्ये नितीन नांदगावकर यांनी मनसेमध्ये असताना कराची बेकरी या नावाला विरोध केला होता. याच मुद्द्यावरून मनसेचे हाजी सैफ शेख यांनीही वांद्रे येथील कराची बेकरीसमोर गोंधळ घातला होता. सिंधी समुदायातील दुकानमालकाकडे दुकानाचं नाव बदलण्याची मागणी मनसेनं केली होती. कराची हे नाव राष्ट्रभावनेच्या विरोधी असून, देशविरोधी वाटतं, असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, हाजी सैफ शेख यांनी बुधवारी कराची बेकरीनं मुंबईतील दुकानं बंद केल्याची माहिती दिली. “नाव बदलण्यासाठी कराची बेकरीसमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर अखेर मुंबईतील कराची बेकरी हे दुकानं बंद करण्यात आलं आहे.” असं शेख यांनी म्हटलं आहे.

शेख यांनी ही पोस्ट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डललाही टॅग केली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये मनसेनं कराची बेकरीच्या नावाला विरोध करत नाव बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा मुद्दा राज्यात चर्चेत आला होता. त्यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ही पक्षाची भूमिका नसल्याचं म्हटलं होतं.

“मनसेच्या इशाऱ्यामुळे दुकान बंद केलं नाही”

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, बेकरीचं दुकान मनसेच्या इशाऱ्यामुळे बंद केलेलं नाही, असं बेकरीचे व्यवस्थापक रामेश्वर वाघमारे यांनी म्हटलं आहे. “दुकानाचा भाडे करार संपल्यानं दुकान बंद केलं आहे. कारण जागेचे मालक जास्त भाडे मागत होते. लॉकडाउनच्या काळात व्यवसाय बंद असल्यानं जास्तीचं भाडं देणं शक्य नाही,” असं वाघमारे यांनी म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After mns threat bandra karachi bakery pulls down shutters bmh
First published on: 04-03-2021 at 13:17 IST