भाजपतर्फे राज्यसभेच्या तीन जागांपैकी एका जागेसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी अर्ज भरला. दुसऱ्या जागेसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे अखेर अर्ज भरण्यास तयार झाल्याचे समजते. त्याचबरोबर तिसऱ्या जागेसाठी भाजपने ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना गळ घातल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत असून त्यासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या वाटय़ाला संख्याबळानुसार तीन जागा येत आहेत. त्यापैकी एका जागेसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी अर्ज भरला. राज्यसभेवर जाण्यास राणे नाखूश होते. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून तशी भावनाही व्यक्त केली होती. राज्य मंत्रिमंडळात येण्यास राणे इच्छुक होते. मात्र राज्यसभा वगळता इतर पर्याय शक्य नसल्याचे राणे यांना कळवण्यात आले. त्यामुळे आता दुसरा मार्ग नसल्याने राणे राज्यसभेसाठी तयार झाल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर तिसऱ्या जागेसाठी भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे विचारणा केली. खडसे हे राज्यातच राहण्यास इच्छुक आहेत. खडसे यांनी पक्षाकडे राज्यसभेवर जाण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत विचारणा करता, पक्षाने जर आदेश दिला तर त्याबाबत विचार करता येईल, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.