ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार थेट पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. शहर आणि जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी ते करणार आहेत.

मुंबईत शरद पवारांच्या ईडी भेटीचा हायव्होल्टेज ड्रामा संपल्यानंतर पवारांनी ट्विट करीत आपण तत्काळ पुणे भेटीवर जाणार असल्याचे म्हटले आहे. “पुणे शहर व जिल्ह्यातील बारामती, पुरंदर परिसरात मागील दोन दिवसांत अतिवृष्टीने व महापुराने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने त्या भागातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी आणि जनतेला दिलासा देण्यासाठी मी तातडीने जात आहे, याची कृपया नोंद घ्यावी.” असे ट्विट त्यांनी केले आहे. दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला होता. शहर आणि जिल्ह्यामध्ये भिंत पडून आणि पाण्याच्या लोंढ्यामध्ये वाहून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला तर सहा ते सात नागरिक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये शेकडो जनावरांचाही मृत्यू झाला आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी स्वतःहून २७ सप्टेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांचा पाहुणचार घेणार असल्याचे तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यानुसार, ते आज ईडीच्या कार्यालयाला भेट देणार होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी करुन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पवारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या ईडी कार्यालय भेटीमुळे महाराष्ट्रात व मुंबई शहरात तणावाची परिस्थिती असल्याचे सांगत ही भेट टाळावी, अशी विनंती केली. या विनंतीनंतर मुंबई येथील ईडी कार्यालयास भेट देण्याचा निर्णय तूर्तास तहकूब करीत असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले.

तत्पूर्वी, ईडी कार्यालयातील सक्षम अधिकाऱ्याने काल सायंकाळी ई-मेलद्वारे शरद पवारांना २७ सप्टेंबर रोजी व्यक्तिशः हजर राहण्याची आवश्यकता नसून, आवश्यकता भासल्यास त्यांना रीतसर सूचनेद्वारे बोलविण्यात येईल असे कळविले होते.