मध्य प्रदेशात सत्तांतराचा प्रयोग यशस्वी झाल्यावर राजस्थानमधील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याची भाजपच्या योजनेला सचिन पायलट यांच्या बंडामुळे बळ मिळाले. राजस्थाननंतर महाराष्ट्राची सत्ता हेच भाजपचे मुख्य लक्ष्य आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपापसातील वादातून गडगडेल, असे भाकित भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याकडे बंडानंतर उद्भवलेल्या राजकीय घडामोडींकडे भाजप नेत्यांचे बारीक लक्ष आहे. भाजपसमोर सर्व पर्याय खुले असल्याचे विधान राजस्थान भाजप अध्यक्षांनी केल्याने संभ्रम वाढला. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर सर्व आमदारांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले यावरून सारे काही आलबेल नाही हाच संदेश गेला.

मध्य प्रदेश, राजस्थान व नंतर महाराष्ट्र ही विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये पुन्हा सत्ता संपादन करण्याचे भाजपचे लक्ष्य होते. यानुसार मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडाने काँग्रेस सरकार गडगडले. राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडाने भाजपच्या आशा पल्लवित झाल्या. भाजप नेत्यांचा पाठिंबा असल्याशिवाय सचिन पायलट एवढे धाडस करण्याची शक्यता नाही, असे काँग्रेसमध्येही बोलले जाते.

राजस्थाननंतर भाजपचे लक्ष हे महाराष्ट्रावर आहे. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागणार नाहीत. आपापसातील वादातून ते पडेल, असे मत गेल्याच आठवडय़ात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त के ले होते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये परस्परांबद्दल निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणामुळे हे सरकार लवकरच पडेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सारखे ‘मातोश्री’ वा महापौर बंगल्यावर जावे लागते. यातच सारे आले, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

कोणती व कशी राजकीय समीकरणे तयार होतात याबाबत भाजपचे नेते मौन बाळगून आहेत. परंतु राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार महिना-दोन महिन्यांत गडगडेल, असा ठाम विश्वास व्यक्त करतात.