पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या आयोजनावरून शिवसेनेकडून तोंडाला काळे फासण्यात आलेले सुधींद्र कुलकर्णी पुढील आठवड्यात पाकिस्तानमध्ये जाणार आहेत. ‘नायदर ए हॉक नॉर ए डोव्ह : अ‍ॅन इनसाइडर्स अकाऊंट ऑफ पाकिस्तान्स फॉरेन पॉलिसी’ या पुस्तकाच्या कराचीतील प्रकाशन सोहळ्यासाठी कसुरी यांनी दिलेले निमंत्रण मी स्विकारल्याचे सुधींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. त्यासाठी कुलकर्णी १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान पाकिस्तानमध्ये जाणार आहेत. कसुरी यांचे हे पुस्तक भारत आणि पाकिस्तानमधील शांतता प्रक्रियेच्यादृष्टीने महत्त्वपू्र्ण आहे. त्यामुळे २ नोव्हेंबरला कराची येथे होणाऱ्या प्रकाशन सोहळ्यासाठी मी उपस्थित राहणार असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले. यापूर्वी २००५मध्ये सुधींद्र कुलकर्णींनी लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबर कराचीला भेट दिली होती. मात्र, त्यावेळी लालकृष्ण अडवाणींना मोहम्मद अली जीनांची स्तुती केल्यामुळे हा दौरा वादग्रस्त ठरला होता.