घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सुविधा आज, सोमवारपासून सर्व मुंबईकरांसाठी सुरू होणार आहे. एकतृतीयांश प्रवासी क्षमतेसह मेट्रो फेऱ्यांची संख्या अर्ध्यावर आणण्यात आली आहे. मार्च महिन्यामध्ये देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून ही सेवा बंदच होती. त्यानंतर आता नव्या नियमावलीसह मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. सोमवारपासून दिवसभरात मेट्रोच्या २०० फेऱ्या होणार असून एका वेळी फक्त ३६० प्रवासीच प्रवास करू शकतील. अंतरनियम आणि आरोग्य सुरक्षेसंदर्भात मेट्रो रेल्वे आणि स्थानकांवर व्यवस्थापनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मेट्रो- १चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय कुमार मिश्रा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारपासून मेट्रोची वारंवारिता साडेसहा ते आठ मिनिटांवर आणण्यात आली आहे. करोनापूर्व काळात हीच वारंवारिता तीन ते पाच मिनिटे इतकी होती. त्यामुळे करोनापूर्व काळात दिवसाला ३५० ते ४०० फेऱ्या होत होत्या. त्याऐवजी आता दिवसाला केवळ २०० फेऱ्या होतील, असे मिश्रा यांनी सांगितले. सुरुवातीच्या काही दिवसांनतर फेऱ्यांची संख्या वाढवायची का, याबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी नमूद केले. गर्दीच्या वेळी प्रवासी संख्या वाढल्यास घाटकोपर आणि वर्सोवा येथे प्रत्येक एक मेट्रो कायम तयारीत ठेवलेली असेल. त्याचा वापर त्वरित केला जाईल.

प्रवासी संख्येवरदेखील नियंत्रण आणले असून एका फेरीत १३५० प्रवाशांऐवजी ३६० प्रवासीच आता प्रवास करू शकतील. प्रत्येक गाडीचे दररोज रात्री र्सवकष र्निजतुकीकरण केले जाईल, तसेच प्रत्येक फेरीनंतरदेखील र्निजतुकीकरण करण्यात येईल, असे मिश्रा यांनी या वेळी सांगितले.

मेट्रोने प्रवास करताना…

– मास्क आणि तापमान तपासूनच प्रवेश.

– एक सोडून एक आसनव्यवस्थेमुळे १०० प्रवासी बसून प्रवास करू शकतील.

– उभे राहून प्रवास करण्यास २६० प्रवाशांना परवानगी.

– प्लास्टिक टोकन बंद.

– कागदी तिकिट अथवा क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल तिकिटाचा वापर.

– रिचार्ज कार्डावरील शिल्लक रकमेवर परिणाम होणार नसून, सहजपणे वापरता येईल. त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

– स्थानकात प्रवेश करणे आणि बाहेर जाण्यासाठी केवळ दोन ते चार मार्गाचाच वापर करता येईल.

– प्रत्येक स्थानकात गर्दीनुसार ३० ते ६० सेकंदांचा थांबा.

– वातानुकूलित यंत्रणेचे तापमान २५ ते २७ सेंटिग्रेड इतके ठेवले जाईल, तसेच ताजी हवा येण्यासाठी काही बदल केले जातील.

– सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या काळात मेट्रो रेल्वेगाडय़ा धावतील.