*  व्यवसायाच्या निमित्ताने अंबानी बंधू एकत्र
*  मुकेश यांच्या ४जीला अनिल यांचे केबल नेटवर्क!
स्वतचे वेगळे साम्राज्य उभारायच्या ईर्षेने विभक्त झालेले अंबानी बंधू सात वर्षांनंतर मंगळवारी पुन्हा एकत्र आले, ते व्यवसायाचे गुणोत्तर वाढून पुन्हा ‘दुनिया मुठ्ठी’मध्ये करण्याच्या इराद्याने.. जलद तंत्रज्ञानावर आधारित दूरसंचार सेवा देणाऱ्या ४जी ब्रॉडबॅण्ड व्यवसायासाठी थोरले बंधू मुकेश यांनी धाकटे अनिल यांच्या ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’द्वारे पुरविले जाणाऱ्या ऑप्टिक फायबरसाठी एक करार मंगळवारी केला. याअंतर्गत करण्यात आलेल्या १,२०० कोटी रुपयांच्या एका करारान्वये, मुकेश यांच्या ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’ला अनिल अंबानी देशभरातील प्रमुख शहरांदरम्यानचे १.२० लाख किलोमीटरचे ऑप्टिक फायबरचे जाळे विणणार आहे. २००५ मध्ये मुकेश व अनिल हे दोघे अंबानी बंधू व्यावसायिक मतभेदांमुळे विभक्त झाले होते. रिलायन्स उद्योगसमूहाची ही थोरली व धाकटी पाती पुन्हा एकत्र आल्याने भांडवली बाजारासाठीही ‘मंगल’दिन ठरला!
वेगाने प्रसारित होणाऱ्या आणि मोठय़ा प्रमाणात महसुल मिळवून देणाऱ्या दूरसंचार क्षेत्रापासून मुकेश यांना फार काळ लांब राहता आले नाही. उभय बंधूंदरम्यानचा ‘स्पर्धा करार’ संपुष्टात येताच थोरल्या बंधूंनी पुन्हा या क्षेत्रात येण्याचे निश्चित करून भविष्यातील अत्याधुनिक दूरसंचार सेवा ठरलेल्या ४जी तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात पदार्पण करण्याचे ठरविले. यासाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने ४जी या सेवेसाठी २०१० मध्ये देशभरातील सर्व २२ परिमंडळात परवाने प्राप्त करणाऱ्या ‘इन्फोटेल ब्रॉडबॅण्ड’चा ९५ टक्के हिस्सा खरेदीसह ताबा घेतला. त्यानंतर ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’ असे त्याचे नाव झाले. आता नव्या करारामुळे रिलायन्सची ४जी तंत्रज्ञानावरील जलद ब्रॉडबॅण्ड सेवा येत्या काही महिन्यात प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सवरील आर्थिक ताणही काहीसा कमी झाला आहे.
देशभरात २० हजारांहून अधिक दूरसंचार मनोरे असणाऱ्या अनिल यांच्या कंपनीवर ३७,३६० कोटी रुपयांच्या कर्जाचा भार आहे. तो कमी करण्याच्या हेतूने काही प्रमाणातील व्यवसाय विक्रीचा त्यांचा मार्गही यापूर्वी दोनवेळा अडखळला होता.