रात्रीचे प्रकाश प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मरिन लाइन्स परिसरातील जिमखान्यांमधील दिव्यांच्या भगभगीत प्रखर प्रकाशझोतामुळे या भागातील प्रकाश प्रदूषणाच्या समस्येने उग्र रुप धारण केले असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात चिराबाजार येथील रहिवाशांनी जिमखान्यांमध्ये लावण्यात आलेल्या दिव्यांमुळे प्रकाश प्रदूषणाची समस्येला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने मरीन लाइन्स लगत असणाऱ्या जिमखान्यातील दिव्यांना विशिष्ट वेळेनंतर बंद करण्याचे तसेच त्यांची दिशा बदलण्याचे आदेश जिमखाना प्रशासनाला दिले आहेत. तसेच प्रखर प्रकाश निर्माण करणाऱ्या दिव्यांच्या वापरासंदर्भात कोणत्याही प्रकारचे नियम अस्तिवात नसल्याने संबंधीत विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

मैदाने किंवा जिमखानेच नव्हे तर विविध विकास प्रकल्प, मनोरंजनाची ठिकाणे आदींमुळे होणारम्य़ा ‘प्रकाश प्रदूषणा’चा प्रश्न त्यासंबंधी तक्रार दाखल झाल्यानंतर  अधोरेखित झाला आहे. जल, ध्वनी, वायू प्रदूषणाला नियंत्रणात आणण्यासाठी कायदे अस्तिवात असले तरी प्रकाश प्रदूषणाबाबत कोणत्याच नियमांची आखणी आजवर करण्यात आलेली नाही. मरिन डाइव्ह समुद्रकिनाऱ्याच्या समोरील बाजूस अनेक जिमाखाने आहेत.

रात्रीच्या वेळी येथील मैदानांमध्ये क्रिडा स्पर्धा, लग्नसोहळा किंवा इतर समारंभांकरिता प्रकाशाची उढळण करणारे फ्लड दिवे लावण्यात येतात. हे दिवे रात्री बारा वाजेपर्यंत किंवा काही वेळा पहाटेपर्यंत पेटते ठेवले जात असल्याने प्रकाश प्रदूषणाची समस्या उद्भवल्याची तक्रार येथून सुमारे दीड ते दोन किलोमीटरवर असणाऱ्या चिराबाजारातील रहिवाशी निलेश देसाई यांनी केली होती. तसेच शहरातील वाढत्या प्रकाश प्रदूषणाबाबत ‘आवाज फाऊंडेशन’ने देखील अभ्यास केला आहे.