News Flash

यंदा उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्यांचा दणदणाट

उत्सवांतील दणदणाटाबाबतच्या याचिकांवर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

(संग्रहित छायाचित्र)

‘डीजे’बंदीनंतरही ध्वनिप्रदूषण कायम; राज्य सरकारला न्यायालयाने फटकारले

यंदा ‘डीजे’बंदीमुळे गणपती विसर्जन मिरणुकांमधील आवाजाच्या पातळीत काही प्रमाणात घट झाली. मात्र, नाशिक ढोल, पुणेरी ढोल आणि बॅन्जोसारख्या पारंपरिक वाद्यांमुळे दणदणाट आणि ध्वनिप्रदूषण यंदाही कायम होते, अशी माहिती ‘आवाज फाऊंडेशन’ने बुधवारी उच्च न्यायालयात दिली. त्याची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांना याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले.

उत्सवांतील दणदणाटाबाबतच्या याचिकांवर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यंदाही गणपती विसर्जनादरम्यान ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन झाल्याचे ‘आवाज फाऊंडेशन’च्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. यंदा गणपती विसर्जनात ‘डीजे’ कुठेही वाजवण्यात आला नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ध्वनिप्रदूषणाच्या पातळीत सहा टक्क्यांनी घट झाली.

मात्र, नाशिक, पुणेरी ढोल आणि बॅन्जोसारख्या पारंपरिक वाद्यांमुळे गणपती विसर्जनादरम्यान ध्वनिप्रदूषण कायम होते, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.

याचिकाकर्त्यांनी (पान ८ वर) प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केलेल्या माहितीची आणि केलेल्या आरोपांची न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनाक यांच्या खंडपीठाने दखल घेतली. राज्य सरकार आणि संबंधित पोलिसांनी याबाबत पुढील सुनावणीच्या वेळी स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले. त्याचवेळी याचिकाकर्त्यांनाही नवरात्रोत्सवातील ध्वनी प्रदूषणाची आकडेवारी सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

ध्वनीजाच..

याचिकाकर्त्यांच्या माहितीनुसार, जुहू परिसरात गणपती विसर्जनादरम्यान वाजविलेल्या नाशिक ढोलमुळे ध्वनीपातळी ९६ ते १०७ डेसिबलपर्यंत होती. रात्री आठच्या सुमारास ही पातळी नोंदवण्यात आली होती. सांताक्रुझ आणि वांद्रे परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास मिरवणुकीत वाजवलेल्या बॅन्जोमुळे ही पातळी ८७ ते ११३ डेसिबलपर्यंत पोहोचली. रात्री ११.३०च्या सुमारास माहीममध्ये ध्वनीपातळी ९८ डेसिबल, माटुंगामध्ये ११० डेसिबल, तर वरळीमध्ये पावणेबाराच्या सुमारास ९६ ते १०९ डेसिबलपर्यंत नोंदवण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 3:58 am

Web Title: after the dj ban soundproofing continued
Next Stories
1 शिवसेनेचे प्रशासनासमोर नमते
2 सौरकृषीपंपांसाठी वीजग्राहकांवर ५४० कोटींचा भार
3 आश्वासनानंतर एसटीचे बेमुदत उपोषण स्थगित
Just Now!
X