मुंबई : प्रवासासाठी ई-पास रद्द केल्यानंतर आणि हॉटेल, रिसॉर्टना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची सशर्त मुभा दिल्यानंतर आठवडय़ाच्या अखेरीस गिरिस्थानांवरील रिसॉर्टना सुमारे २० ते ३० टक्के  प्रतिसाद मिळत आहे.

पर्यटनस्थळी भटकंतीपेक्षा शहरातून बाहेर पडून मोकळ्या हवेत रिसॉर्ट अथवा कृषी पर्यटन केंद्रात राहण्याकडे पर्यटकांचा कल असल्याचे आढळते.

या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ई-पास रद्द केल्यानंतर स्व:च्या वाहनाने शहरानजीकच्या एखाद्या गिरिस्थानापर्यंत किंवा पर्यटनस्थळापर्यंत जाण्याकडे पर्यटकांचा कल वाढू लागला आहे. पाच महिने घरातच अडकून पडलेली अनेक कुटुंबे अशी ठिकाणे शनिवार-रविवारची सुट्टी घालवण्यासाठी निवडत आहेत.

पर्यटकांचा प्रतिसाद असला तरी काही ठिकाणी आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने अनेक व्यवस्थांनी आपणहून संख्येवर मर्यादा, कमीत कमी संपर्क आणि उपक्रम कमी ठेवण्याची बंधने घातली आहेत. ‘करोनापूर्व काळात ८० च्या आसपास पर्यटक येत असत, पण सध्या ही संख्या वीसवर आणल्याचे,’ लोणावळ्याजवळील अंजनवेल कृषी पर्यटन केंद्राचे राहुल जगताप यांनी सांगितले. तसेच जवळच्या गावाशी संपर्क येऊ नये म्हणून केंद्राबाहेरील उपक्रम बंद केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या येणाऱ्या पर्यटकांमध्ये यापूर्वी राहून गेलेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचे जुन्नर येथील पराशर कृषी पर्यटन केंद्राचे मनोज हाडवळे यांनी सांगितले. लोकांना बाहेर पडायचे आहे, मोकळ्या हवेत जायचे असल्याने पर्यटन केंद्राकडे लोकांचा ओढा वाढल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटकांची संख्या गेल्या दोन आठवडय़ांपासून वाढत आहे, मात्र करोना साथीपूर्वी तीन-चार कुटुंबे एकत्र मिनी बसने येत, परंतु सध्या एकेक कुटुंब येत असल्याचे आणि पर्यटकांच्या संख्येवर बंधन घातले आहे, असे नेरळजवळील ‘सगुणा बाग’चे चंदन भडसावळे यांनी सांगितले.  दोन दिवसांपूर्वीच्या जमावबंदीच्या मुदतीत वाढ करण्याच्या आदेशामुळे पर्यटकांचा ओघ आटला आहे. सरकारी आदेशांत स्पष्टता नसल्याने पर्यटकांची मानसिकता बदलते, असे यांनी नमूद केले.

शनिवार-रविवारी गिरिस्थानांवरील रिसॉर्टना सुमारे ३० ते ५० टक्के प्रतिसाद मिळतो, परंतु इतर दिवशी मात्र शुकशुकाट असतो. काही ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायती पर्यटकांच्या येण्यास विरोध करीत आहेत, पण गावाबाहेरच्या रिसॉर्टना मात्र सुट्टीच्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळतो. 

– गुरबक्क्षीसिंग कोहली, उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ इंडिया