कर्नाटकात बी.एस.येडियुरप्पा यांचे सरकार कोसळल्यानंतर देशातील भाजपा विरोधात असलेल्या सर्वच पक्षांना विशेष आनंद झाला. यामध्ये महाराष्ट्रातील मनसे आणि शिवसेना या दोन पक्षांचाही समावेश आहे. मागच्या काही काळापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. शनिवारी दुपारी बहुमत चाचणीआधीच येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मनसेच्या दादर येथील कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एबीपी माझा वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले.

खरंतर कर्नाटकात भाजपाचे सरकार राहिल्याने किंवा कोसळल्याने मनसेला कुठलाही राजकीय लाभ होणार नाहीय. मंगळवारी कर्नाटकात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर हा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा विजय आहे अशी खोचक टिप्पणी केली होती. मनसेने मोदींच्या महत्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन सर्वेक्षणाचे काम सुरु असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिथे पोहोचून हे काम बंद पाडले होते.

शिवसेनाही भाजपा विरोधात मागे नाहीय. केंद्रात आणि राज्यातील सत्तेत अपेक्षित वाटा न मिळाल्याने मागच्या चार वर्षांपासून नाराज असलेल्या शिवसेनेने संधी मिळताच वेळोवेळी भाजपावर कुरघोडी केली आहे. कर्नाटकाच्या राज्यापालांनी बहुमत नसताना येडियुरप्पांना सरकार स्थापनेसाठी बोलावले हे पूर्णपणे असंवैधानिक आहे. कर्नाटकच्या राज्यापालांचा राजीनामा घ्या अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.