इंडियन मुजाहिद्दीनचा कथित दहशतवादी अफजल उस्मानी याचे पलानय पूर्वनियोजीत कटाचा भाग असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली. ज्या अर्थी त्याने सत्र न्यायालयातून पलायन केले ते पाहता तो केवळ योगायोग नव्हता, असे या अधिकाऱ्याने सांगितले. शुक्रवारी तळोजा कारागृहातून मुंबई सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणले असताना पोलिासांची नजर चुकवून उस्मानी फरार झाला होता. दरम्यान त्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी १६ पथके स्थापन केली आहेत.
इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित दहशतवादी अफजल उस्मानी (३७) याला शुक्रवारी तळोजा कारागृहात मुंबई सत्र न्यायलयात आणले होते. त्यावेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाला. न्यायालयाच्या परिसरातील तसेच चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजेसची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद सांवत यांनी दिली.
उस्मानी वेषांतर करण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी सर्व पार्लर आणि सलून्सला सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच्याकडे किती पैसे आहेत हे नेमके पोलिसांनी माहीत नाही. दरम्यान, उस्मानी पळून जाण्याची शक्यता आहे अशा सूचना गुप्तचर विभागाकडून देण्यात आल्या होत्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. शुक्रवारी त्याचे कुणी नातेवाईक पोलीस ठाण्यात आले नव्हते. परंतु पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली आहे. गुन्हे शाखेनेही त्याच्या शोधासाठी सात पथके स्थापन केले असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले.
अलिबागमध्ये झडतीसत्र
मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला दहशतवादी अफझल उस्मानी समुद्रीमार्गाने अलिबागला आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर रायगड पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, शुक्रवारपासून अलिबाग रेवस परिसरात कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली आहे.
अफझल उस्मानी हा बोटीने अलिबागला आल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून प्राप्त झाली होती. या पाश्र्वभूमीवर मांडवा येथील पोलीस चौकीवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिग तपासण्यात आले आहे.मांडवा-रेवसपासून ते अलिबाग नागाव परिसरातील सर्व हॉटेल्स आणि लॉजेसची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणे, एस टी स्टॅण्ड, महत्त्वाच्या चौकात अफझल उस्मानीचे पोस्टर लावले आहेत. तसेच  उस्मानीबाबत मिळाल्यास झाल्यास ०२१४१-२२२१०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.