नवी मुंबईचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाचा संतोष तांडेल याचा अनधिकृत ‘ग्लास हाऊस’ हा आलिशान बंगला जमीनदोस्त करण्याचे आदेश दिल्यानंतर शुक्रवारी उच्च न्यायालयाने या परिसरातील तांडेल याची आणखी पाच अनधिकृत बांधकामेही जमीनदोस्त करण्याचे आदेश सिडकोला दिले.
बेलापूर येथील सुमारे १.४५ लाख चौरस मीटर (सुमारे ३६ एकर) जमीन नाईक, त्यांचा मुलगा संदीप आणि भाचा संतोष तांडेल यांनी बळकावल्याचा आरोप करणारी जनहित याचिका संदीप ठाकूर यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यावर कायदा प्रत्येकासाठी सारखाच असतो. त्यात मंत्री आणि त्यांचे नातेवाईकही येतात, असे परखडपणे नमूद करीत उच्च न्यायालयाने नाईक यांना मागच्या सुनावणीत दणका दिला होता. तसेच बेलापूरच्या खाडीकिनारी रेतीबंदर येथे सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेला नाईक यांच्या भाच्याचा ‘ग्लास हाऊस’ हा आलिशान बंगला जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनाक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाच्या आदेशानुसार ‘ग्लास हाऊस’ जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती सिडकोतर्फे देण्यात आली. मात्र असे असले तरी बळकावलेल्या जागेवर अद्याप आऊट हाऊस, सिक्युरिटी लेन, शौचालय आदी बांधकामे उभी असल्याची बाब ठाकूर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर नोटीस बजावूनही ती जमीनदोस्त करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण सिडकोतर्फे देण्यात आले. तेव्हा या बांधकामांबाबत याचिकेत काहीही नमूद केलेले नसले तरीही ही अनधिकृत बांधकामेसुद्धा जमीनदोस्त करा आणि जमीन ताब्यात घ्या, असे आदेश न्यायालयाने सिडकोला दिले. तसेच महिन्याभराती ती कारवाई पूर्ण करण्याचे स्पष्ट करीत याचिका निकाली काढली.
ठाकूर यांनी सादर आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ सादर केलेल्या कागदपत्रांतून तांडेल याने रेतीबंदर येथील सिडकोच्या ३०१ चौरस मीटर जागेवर अतिक्रमण केल्याचे आणि पालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून तेथे ‘ग्लास हाऊस’ हा बंगला बांधल्याचे उघड होत असल्याचे नमूद करीत न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले होते.