भाजपशी हातमिळवणी करून काँग्रेस पक्षाची पार नाचक्की करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे गोंदियाचे काँग्रेस आमदार गोपाळ अगरवाल राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी ‘साम आणि दाम’ या पातळीवर लढत देऊ शकतात असे प्रस्थ मानले जाते. सर्व आघाडय़ांवर ‘समर्थ’ तसेच दिल्लीतील बडय़ा नेत्यांशी उत्तम संबंध यामुळेच पक्ष त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बोलले जाते.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची युती झाल्याने त्याची राष्ट्रीय पातळीवर प्रतिक्रिया उमटली. अगरवाल यांच्याकडून पक्षाने स्पष्टीकरण मागविले असून, तीन दिवसांत लेखी खुलासा करण्याचा आदेश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला आहे. अगरवाल यांचे लेखी म्हणणे प्राप्त झाल्यावर नवी दिल्लीला अहवाल पाठविला जाईल व त्यानंतरच निर्णय अपेक्षित आहे.
भंडारा-गोंदिया हे जिल्हे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे बालेकिल्ले मानले जातात. पटेल यांना आव्हान देण्याची स्थानिक पातळीवर कोणाचीच ‘ताकद’ नसली तरी अगरवाल हेसुद्धा खर्च करण्यात मागे नसतात, असे सांगण्यात येते. अगरवाल यांचे प्रफुल्ल पटेल यांच्याशी तेवढी कटुता नसली तरी पटेल यांचे उजवे हात समजले जाणारे आमदार रमेश जैन यांच्याशी त्यांचे भलतेच वैर आहे. अगरवाल आणि जैन नजरेला नजर भिडवत नाहीत एवढे उभयतांमध्ये हाडवैर आहे. प्रत्येक वेळी आपणच का माघार घ्यायची, असा सवाल अगरवाल यांनी काँग्रेस नेत्यांना केला आहे. गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्य़ातून अगरवाल हे निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. ‘राष्ट्रवादीकडून प्रत्येक वेळी काँग्रेसचे खच्चीकरण केले जाते. यातूनच काँग्रेसच्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादीबद्दल नाराजीची भावना होती. त्यातूनच जिल्हा परिषद सदस्यांनी तसा निर्णय घेतला असावा. आपला या घडामोडींशी काहीही संबंध नाही, असे अगरवाल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.