रिक्षा आणि टॅक्सी यांच्या भाडय़ात केलेली किमान एक रुपयाची भाडेवाढ लागू करून घेण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचालकांची घाई सुरू झाली असली, तरी मीटर प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेत सध्या दलालांची घुसखोरी सुरू झाल्याने रिक्षा-टॅक्सीचालकांना नाहक भरुदड भरावा लागत आहे. प्रमाणीकरण प्रक्रियेतील चाचणीसाठी विविध केंद्रांजवळ लागणाऱ्या रांगांमध्ये पुढचा नंबर मिळवून देण्यासाठी दलाल रिक्षा-टॅक्सीचालकांकडून दलाल २००-३०० रुपये उकळत आहेत. या प्रकारात वैधमापन शास्त्रे विभागातील अधिकाऱ्यांचाही हात असल्याची टीका करत रिक्षा संघटनांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, हा प्रकार आपल्यालाही जाणवला असून याबाबत तक्रार आल्यास थेट पोलिसांत तक्रार दाखल केली जाईल, असे वैधमापन शास्त्रे विभागातर्फे सांगण्यात आले.
मुंबईतील आठ केंद्रांवर रिक्षा व टॅक्सी चालक मीटर प्रमाणीकरणासाठी गाडय़ा घेऊन रांगा लावत आहेत. प्रमाणीकरणानंतर त्याच्या चाचणीसाठी लावलेल्या या रांगांत पुढील नंबर मिळवून देण्यासाठी दलाल रिक्षा-टॅक्सी चालकांकडे २०० ते ३०० रुपये मागत आहेत. हे प्रकरण वैधमापन शास्त्रे विभागातील अधिकाऱ्यांच्या संगमताने चालत आहे, अशी तक्रार मुंबई ऑटोरिक्षा आणि टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली. ही प्रक्रिया गेल्या वर्षांपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयांमार्फत पार पाडली जात होती. तेव्हा किमान हे असले गैरप्रकार होत नव्हते, असे राव म्हणाले. याबाबत वैधमापन शास्त्रे विभागाचे नियंत्रक संजय पाण्डे यांच्याशी संपर्क साधला असता असे प्रकार घडत असल्याचे आपल्याही निदर्शनास आल्याचे त्यांनी कबूल केले. मात्र यात आपल्या विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा सहभाग नसल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत रिक्षा-टॅक्सीचालकांनी किंवा संघटनेने तक्रार दाखल केल्यास पोलिसांच्या मदतीने दलालांना पिटाळून लावण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.