भारतीय प्रेक्षकांना छोटय़ा पडद्यावर दैनंदिन मालिका पाहण्याची सवय लावणारी आणि क्रिकेटवेडय़ांना ‘एक्स्ट्रा इनिंग’द्वारे सौंदर्य समालोचनाची चव देणारी मंदिरा बेदी नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा छोटा पडदा काबीज करण्यासाठी सज्ज झाली आहे. अमेरिकेतील दहशतवादविरोधी पोलिसी कारवायांची  ‘२४’ (ट्वेंटीफोर) ही लोकप्रिय मालिका अनिल कपूर भारतीय मातीमध्ये त्याच नावाने घडवित आहेत. त्यात हेराच्या भूमिकेमध्ये मंदिरा बेदी दिसणार आहे.
अभिनय देव दिग्दर्शन करीत असलेल्या आणि रेंझिल डिसिल्व्हा यांनी लिहिलेल्या या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अनिल कपूर असणार आहेत. मूळ मालिकेमध्ये हॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार कैफर सदरलंड यांनी ही भूमिका वठविली आहे. ऑगस्ट महिन्यापासून भारतीयांना ही थ्रिलर मालिका पाहायला मिळणार आहे.
या मालिकेसाठी दहा दिवस चित्रीकरण करण्यात आले असून पुढील चार महिने माझ्या कामाचे चित्रीकरण चालणार आहे. मी यात ‘एजंट’च्या भूमिकेमध्ये असल्याचे मंदिराने सांगितले. हा अनुभव थरारक असून नऊ वर्षांनी मालिकेमध्ये परतल्याबद्दलही आनंद वाटत असल्याचे तिने स्पष्ट केले.
या मालिकेत काम करण्यासाठी मी तयार झाले, कारण मूळ मालिका मी पाहिल्या आहेत. याशिवाय अभिनय देवसोबत काम करण्याची माझी इच्छा होती. मालिकेतील नीना मेयर या गाजलेल्या हेराचे काम मी हिंदी आवृत्तीमध्ये करीत आहे. तिस्का चोप्रा आणि अनिता राज या देखील माझ्यासोबत मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत, असे ती म्हणाली. यापूर्वी मंदिराने शांती, क्यों की सांस भी कभी बहू थी या मालिकांत अभिनेत्री म्हणून आणि इंडियन आयडॉल ज्युनिअरमध्ये समालोचक म्हणून लोकप्रिय झाली होती.

काय आहे ‘२४’?
२६/११चा हल्ला झाल्यानंतर दोनच महिन्यांनी सुरू झालेली ‘२४’ मालिका अमेरिकी फॉक्स नेटवर्कवर आजतागायत सुरू आहे. लॉस एंजेलिसमधील दहशतवादविरोधी पथकप्रमुखाच्या कारवाईच्या २४ तासांचा कालावधी हा प्रत्येक मालिकेचा मुख्य कथाभाग असतो. आजतागायत १९२ भाग झालेल्या या मालिकेची लोकप्रियता जराही ओसरली नाही. या मालिकेचे पुढील वर्षांपर्यंतचे भाग तयार आहेत. भारतीय रूपांतरणानंतर लोकांना ‘२४’चे भाग आवडतील का याचे कुतूहल टीव्ही वर्तुळात सध्या वाढले आहे.