संदीप आचार्य 
मुंबई: करोनाचा गंभीर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयातील अपघात विभागात येताच तात्काळ ऑक्सिजन दिला जावा तसेच अर्ध्या तासाच्या आत औषधोपचार सुरु झाला पाहिजे. तसेच रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्याशी संवाद साधून मानसिक आधार व उपचाराची दिशा तपासण्याची रणनीती निश्चित करण्यात आली. त्याचप्रमाणे रेमडिसीवीर पासून अत्यावश्यक औषधे पुरेशा प्रमाणात ठेवण्याचे आदेश देतानाच करोना रुग्णांवर उपचार करताना आपल्या आई- वडिलांवर ज्या प्रेमाने उपचार कराल तेच प्रेम प्रत्येक रुग्णाबाबत असू दे, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी सांगितले.

मुंबई महापालिका रुग्णालयातील करोना रुग्णांवरील उपचाराची दिशा परिणामकारक करणे तसेच मृत्यू रोखण्यासाठी नेमके काय करता येईल यावर विचार करण्यासाठी महापालिका आयुक्त चहेल यांनी सर्व अतिरिक्त आयुक्त, अधिष्ठाते, प्रमुख डॉक्टर व पालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने तसेच काही खाजगी तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत रेमडिसीवीर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा आदी महागडी औषध पुरेशा प्रमाणात तात्काळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरेशा औषधांचा साठा प्रत्येक रुग्णालयात असलाच पाहिजे, असे आयुक्तांनी सांगितले.

यातला महत्वाचा भाग म्हणजे, मधुमेह, उच्च रक्तदाब आदींचा त्रास असणार्या कोमॉर्बीड रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना रुग्णवाहिकेतच ऑक्सिजन दिला पाहिजे. तसेच रुग्ण अपघात विभागात दाखल होताच पल्स ऑक्सिमीटरच्या माध्यमातून ऑक्सिजनची पातळी तपासून पहिल्याप्रथम ऑक्सिजन द्यावा आणि पहिल्या अर्ध्यातासातच औषधोपचार सुरु झाला पाहिजे, असे मत बैठकीत उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडला. रुग्णांची नर्सिंग केअर व्यवस्थित होणे आवश्यक असून कोमॉर्बीड रुग्णांना वरिष्ठ डॉक्टरांनी नियमित भेट देऊन त्यांच्यावरील उपचाराची माहिती घेतली पाहिजे, असे निश्चित करण्यात आले.

मुंबईत आजघडीला ७०,७७८ करोना रुग्ण असून ४०६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील मृत्यूदर जास्त असून तो खाली आणण्याची गरज आहे. यासाठी पालिकेने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सच्या माध्यमातून जगभरातील उपचार पद्धती, नवीन औषधे व त्यांचे परिणाम यांचा अभ्यास केला जातो. या अभ्यासाच्या आधारे तसेच करोना रुग्णांच्या मृत्यूंच्या कारणांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी नेमलेल्या डॉ. अविनाश सुपे समितीच्या शिफारशींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला. आजच्या बैठकीत डॉ. संजय ओक तसेच डॉ.शशांक जोशी यांनी प्रभावी उपचाराबाबत काही मुद्दे मांडले. यात मधुमेहाच्या व रक्तदाबाच्या रुग्णांची घ्यायची काळजी, रेमडिसीवीर सारख्या औषधांचा वापर, रुग्णांची नर्सिग केअर यावरही चर्चा करण्यात आली. रुग्णाला वेळेत रुग्णालयात दाखल करणे, अपघात विभागात येताच करावयाचे उपचार व दाखल केल्यानंतर घ्यायची काळजी याचबरोबर केईएम, शीव व नायर रुग्णालयात समन्वय असणे व या तिन्ही रुग्णालयांचा उपनगरीय रुग्णालयांशी समन्वय प्रभावी करण्याचे ठरले. यावेळी बोलताना यापुढे रुग्ण हा तुमच्या घरातील एक व्यक्ती आहे, तुमचे आईवडील आहेत, असे समजून उपचार करण्याचे आवाहन आयुक्त इक्बालसिंग चहेल यांनी केले.