महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जमीन घोटाळाप्रकरणी आरोपांच्या फैरी झडत असतानाच त्यांच्या विरोधकांचे आणि समर्थकांचे आंदोलन नाटय़ आझाद मैदानाच्या भूमीवर रंगले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. तर त्याच्याच शेजारी खडसे यांच्या समर्थनार्थ अल्पसंख्याक समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद अमीर यांनी या करिता पुढाकार घेत खडसे समर्थकांना जमा केले आहे.
दमानिया यांचे आंदोलन सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झाले. परंतु, या आंदोलनाला अल्प प्रतिसाद होता.
खडसे समर्थकांचे आंदोलन
खडसे यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनात अनेक मुस्लिम आणि भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. खडसे समर्थकांनी ध्वनीक्षेपक लावल्याने दमानिया यांचा आंदोलनाचा आवाज दडपून टाकला होता. ‘खडसे यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून काही लोक प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे आरोप करत असतात. नाथा भाऊ अल्पसंख्याक नागरिकांच्या पाठीशी उभे राहीले होते. त्यामुळे आज आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. जर खडसेंवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तर त्यांच्यासाठी आम्ही मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर उतरु असा,’ असा इशारा अमीर यांनी दिला.