दत्तक शाळांच्या नावाखाली शक्षिणाच्या खासगीकरणाचा प्रयोग पूर्णपणे फसला असतनाही मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पुन्हा या शाळा एनजीओ व खासगी संस्थांना चालवायला देण्याचा घाट घातला आहे. पालिका शाळांच्या खासगीकरणाचा हा डाव हाणून पाडण्याचा निर्धार भारिप-बहुजन महासंघाने केला आहे.
या प्रश्नावर लवकरच मुंबईत तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भारिपच्या प्रवक्तया डॉ. उज्वला जाधव व समान शिक्षण अधिकार समितीचे निमंत्रक घनश्याम सोनार यांनी दिली.  
मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये गरीब, कष्टकरी व मध्यमवर्गियांची मुले शिकतात. शाळांना चांगल्या सविधा देणे व शिक्षणाचा दर्जा उंचावणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु ही जबाबदारी झटकून शाळांचे खासगीकरण करण्याचा घाट सत्ताधारी शिवसेना-भाजपने घातला आहे.
 खासगी संस्थांच्या ताब्यात या शाळा गेल्या तर गरीब, कष्टकरी वर्गातील सुमारे ४ लाख मुलांचा शिक्षणाचा हक्क नाकारला जाणार आहे, अशी भिती डॉ. जाधव व सोनार यांनी व्यक्त केली आहे.
महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी दत्तक शाळा योजना सुरु करण्यात आली होती. परंतु त्यामुळे शिक्षणातील गुणवत्ता सुधारलेली नाही, ही योजनाच फसली आहे. तरीही आता पुन्हा वेगळ्या मार्गाने खासगी संस्था व एनजीओंच्या ताब्यात शाळा देऊन शिक्षणाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न केला जात  आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
मुंबई महापालिका शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत, कर्मचारी नाहीत, अनेक शाळांमध्ये एक शिक्षकी व दोन शिक्षकी वर्ग भरतात. शाळांच्या खोल्या लहान आहेत, मुलांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे अशा प्राथमिक सुविधाही दिल्या जात नाही, मग शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार, असा त्यांचा सवाल  आहे.