दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति लिटर १० रुपये अनुदान जमा करावे आणि दूध भुकटीला निर्यातीसाठी प्रति किलो किमान ५० रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती, तर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.

संघर्ष समितीतर्फे  गावच्या चावडीवर आणि संकलन केंद्रावर दुधाचा अभिषेक घालत निदर्शने करण्यात येणार आहेत. तर महायुतीतर्फे रस्त्यावर उतरून (दूध किंवा वाहनाचे नुकसान न करता) आंदोलन के ले जाणार आहे.

दुधाला प्रति लिटर किमान ३० रुपये भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, तसेच देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान ५० रुपये अनुदान द्या या प्रमुख मागण्यांसाठी भाजपतर्फे  राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मावळ तालुक्यात या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

राज्यात टाळेबंदी वाढविण्यात आल्यामुळे जमावबंदीचा आदेश न मोडता राज्यभरात आंदोलन केले जाईल. लोकशाही मार्गाने आंदोलन करताना एक दिवस दूध घालू नका असे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येणार असून दूध वाहतूक करणारे ट्रक रोखले जातील. मात्र दुधाची नासाडी न करता हे आंदोलन होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सरकारने वेळीच दूध दराचा प्रश्न सोडविला नाही तर ५ ऑगस्टपासून आंदोलन अधिक  तीव्र केले जाईल. या आंदोलनात महायुतीचे सर्व नेते ठिकठिकाणी सहभागी होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

मागण्या काय ? : २६ जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने बाहेरच्या देशातून १० लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा, जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थाच्या आयातीला परवानगी देण्याचा निर्णय तातडीने रद्द करा आदी मागण्यांसाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्या वतीनेही शनिवारी आंदोलन केले जाणार आहे. या वेळी गावोगावी चावडीवर दुधाचा अभिषेक घालत व निदर्शने करत हे आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचे संघर्ष समितीचे सरचिटणीस अजित नवले यांनी सांगितले.