करोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जिवाशी खेळत, आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करीत आहेत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे मंगळवारी केली. तसेच लसीकरण आणि तिचे वितरण याबाबत राज्यात कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून करोनाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील आठ राज्यांचा मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली. करोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसेच करोना प्रतिबंधित क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल. आज दिल्लीत, केरळमध्ये संसर्ग वाढला आहे तर उद्या आणखी कुठल्या राज्यात वाढेल. महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी २४ हजार रुग्ण दररोज सापडायचे, तिथे आता ४७०० ते ५००० रुग्ण दररोज आढळत आहेत. राज्यातील रुग्ण संख्या कमी होत असली तरी सरकारने जनतेला गाफील न राहण्याच्या आणि हात स्वच्छ धुणे, तोंडावर मुखपट्टी आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व  पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे व राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी केली.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कृतिदल

करोनावरील प्रभावी लशीचे वितरण करणे तसेच ती कोणाला प्राधान्याने द्यावी याबाबतचा प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि त्या लशीची किंमत व प्रमाण ठरविण्यासाठी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली कृतिदलाची (टास्क फोर्स) स्थापना करण्यात आली आहे.