आझाद मैदानातील नाटय़
इंदापूरच्या सभेत दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडविणारे विधान अजित पवार यांनी ज्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला उद्देशून केले त्या सोलापूर परिसरातील शेतकऱ्यांचा घसा मात्र ७४ दिवसानंतरही कोरडाच आहे. त्यामुळे संतापलेल्या एका शेतकऱ्याने ‘पाणी द्या, नाही तर जीव घ्या’ असे म्हणत आझाद मैदानात बुधवारी सुमारे ३० फूट उंच झाडावरून उडी मारली.
‘पिण्यासाठी कालव्यात पाणी सोडा’ अशी मागणी करीत आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी धनाजी हावळे हा तरूण ‘पाणी द्या, नाही तर जीव घ्या’ असे म्हणत झाडावर चढला. त्यावेळी घटनास्थळी असणाऱ्या पोलिसांनी झाडाला वेढा दिला. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. पण झाडावरच या तरुणाने चकवाचकवी सुरू केली. अखेर पोलिसांनी झाडाच्या खालीच एक मोठी ताडपत्री पकडून धरली. तेवढय़ात अचानक धनाजीने झाडावरून खाली उडीच मारली. पण पोलिसांनी त्याला ताडपत्रीवर झेलले. उडी मारल्यानंतर तो बेशुध्द पडल्याने त्याला तात्काळ जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, एवढे होऊनही सत्ताधारी अथवा विरोधी पक्षांनी या घटनेची दखलही न घेतल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली आहे. आमच्या डोळ्यातील पाणी आटले तरी यांचे मात्र डोळे उघडलेले नाहीत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका आंदोलनकर्त्यां महिलेने दिली. तर जोपर्यंत कालव्यात पाणी सोडले जाणार नाही तोपर्यंत असेच आंदोलन सुरू राहील, अशी घोषणा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैय्या देशमुख यांनी केली.