राज्यात झपाटय़ाने वाढत चाललेल्या कृषी पर्यटन व्यवसायाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या व्यवसायातून लोकांसाठी चांगल्या रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. या पाश्र्वभूमीवर कोकण भूमी कृषी पर्यटन सह. संस्था आणि महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत एका कृषी पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कृषी पर्यटनातील रोजगाराच्या संधी, सोशल नेटवर्कचा कृषी पर्यटनातील उपयोग, कृषी पर्यटनातील नावीन्यपूर्ण संकल्पना, होम स्टे, ग्रामीण पर्यटन अशा विविध विषयांवर कृषी पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी या परिषदेत मार्गदर्शन केले. राज्यात सध्या ४०० हून अधिक पर्यटन केंद्रे सुरू आहेत आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहाता पुढील पाच वर्षांत सुमारे १० हजार पर्यटन केंद्रे उभी राहतील, असा विश्वासही या परिषदेत व्यक्त करण्यात आला. या वेळी डहाणू येथील शाबीर इराणी यांनी माती, लाकूड, बांबू, गवत यांचा उपयोग करून कमी खर्चात उत्तम प्रतीचे बांधकाम करता येऊ शकते यावर मार्गदर्शन केले, तर डहाणू येथील चिकू महोत्सवाचा स्थानिक आदिवासींना कसा फायदा झाला याची माहिती तारपा कृषी पर्यटन केंद्राचे संचालक प्रभाकर सावे यांनी सांगितले, तर पुणे येथील मोराची चिंचोली या ठिकाणी वर्षभरामध्ये हजारो पर्यटकांनी भेटी दिल्याचे अण्णा गोरडे म्हणाले. या पर्यटन परिषदेला मोठय़ा प्रमाणात कृषी पर्यटनप्रेमी उपस्थित होते.