News Flash

‘आघाडी सरकार साकारण्यात अहमद पटेल यांचा सिंहाचा वाटा’

प्रदेश काँग्रेसच्या वतीने सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

अहमद पटेल यांना सोमवारी मुंबईत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.

राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येणे व महाविकास आघाडी सरकारची स्थापना करणे, या सर्व प्रक्रियेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत अहमद पटेल यांचा सिंहाचा वाटा होता, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

प्रदेश काँग्रेसच्या वतीने सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अहमद पटेल म्हणजे सतत कामात व्यस्त असणारा माणूस, अशी माणसं शोधून सापडत नाहीत. शेवटपर्यंत ते कार्यरत राहिले  पण कधीच मंत्री करा अशी मागणी केली नाही. त्यांनी स्वत:ला पक्षासाठी वाहून घेतले होते. महाराष्ट्रातील राजकारणात अहमद पटेल यांच्यामुळेच तीन पक्ष एकत्र आले.

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, १९८४ साली राजीव गांधी यांच्याबरोबर काही तरुण चेहरे दिसत होते त्यात अहमद पटेल होते. आयुष्यभर त्यांनी संघटनेसाठी काम केले. सतत संघटनेचाच विचार त्यांच्या मनात असायचा. यूपीएचे सरकार केंद्रात असताना दहा वर्षे त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. यूपीए सरकारच्या वेळी काही समस्या निर्माण झाली तर त्यातून मार्ग काढण्यासाठी सोनिया गांधी व मनमोहनसिंग यांच्यावतीने ते जबाबदारी पार पाडत असत, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत. सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही. त्यांचा  कल हा संघटनेसाठी काम करण्याकडे होता.

महाविकास आघाडीचे सरकार साकारण्यात  अहमद पटेल यांची भूमिका महत्त्वाची होती. शेवटच्या क्षणात त्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यामुळे हे सरकार स्थापन झाले, असे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशांतल्या राजकारणात त्यांचे वेगळे स्थान होते. माझी त्यांच्याशी दोन वेळा भेट झाली होती, अतिशय साधेपणाने वागणे, बोलणे होते. ज्यांनी अनेक मंत्री, मुख्यमंत्री बनवले, पण ते स्वत: कधी मंत्री झाले नाहीत. पक्ष संघटन बांधणीकडे कायमच लक्ष दिले. अनेक पक्षात मंत्री होणारे असतात, पण पाठीमागे राहून काम करणारे अहमदभाई सारखे कमी असतात.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी  एच. के. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी के ंद्रीय मंत्री  सुशीलकु मार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड आदींनी अहमद पटेल यांच्या आठवणींना उजाळा दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:22 am

Web Title: ahmed patel share in forming alliance government abn 97
Next Stories
1 देयके थकल्याने वितरकांकडून औषध पुरवठा बंद
2 कोल्हापूर, सातारा, नाशिकच्या केबल चालकांची चौकशी
3 तिजोरीवर ताण
Just Now!
X