नव्या अभ्यासक्रमात आता कला, साहित्य, इंग्रजी संभाषण आणि योग शिक्षणाचाही समावेश

अभियंता बनण्यासाठी अभ्यासक्रमाची सारी वर्षे गणितातील अवघड समीकरणांच्या जंजाळात आणि प्रयोग-प्रात्यक्षिकांच्या चरक्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या कलाजाणिवा विस्तारत नाहीत. त्यांना कलेचे योग्य भान मिळण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशपातळीवर एकच अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आता कला, साहित्य, योग, खेळांचाही अभ्यास करावा लागणार आहे. यातून महाविद्यालयांना प्रात्यक्षिके आणि उपक्रमांसाठी अधिक वेळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेतील लेखन कौशल्य, संभाषण यांचाही अभ्यासक्रमांत समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी शाखेत अभ्यासण्यात येणारे विषय, त्यांचे नियोजन आणि मूल्यमापनाची पद्धत यांमध्ये वैविध्यता असल्यामुळे शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता एआयसीटीईने अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी आराखडा निश्चित केला आहे. त्यामुळे विषय, त्यांचे सत्रानुसार नियोजन आणि मूल्यमापन आता देशभरातील सर्वच महाविद्यालयांमध्ये एकसमान असेल. यापूर्वी २०० श्रेयांकाचा (क्रेडिट्स) अभ्यासक्रम अभियांत्रिकी पदवीसाठी होता. नव्या आराखडय़ानुसार आता विद्यार्थ्यांना १५० ते १६० श्रेयांकाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.

परिचय शिबीर बंधनकारक महाविद्यालयांनी कला, खेळ, मूल्यशिक्षण या विषयांची ओळख करून देण्यासाठी, अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून परिचय शिबीर (इंडक्शन प्रोग्रॅम) घेणे बंधनकारक आहे. वर्षभरात तीन  आठवडय़ांच्या या शिबिराला विद्यार्थ्यांना हजेरी लावावी लागेल. सध्या देशभरातील बहुतेक आयआयटीमध्ये मूल्यशिक्षण शिबीर किंवा फाऊंडेशन कोर्स घेण्यात येतात. त्या धरतीवर हे शिबीर असेल. ज्या महाविद्यालयांना शक्य आहे त्यांनी निवासी शिबीर घेण्याची सूचनाही परिषदेकडून एआयसीटीईकडून करण्यात आली आहे. या शिबिरामध्ये पहाटे सहा वाजता शारीरिक शिक्षण आणि योगअभ्यासासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय गाठावे लागेल. त्यानंतर कला, साहित्याची ओळख, विविध क्षेत्रांतील मान्यवरांची व्याख्याने, स्थानिक परिसरातील संस्थांना भेटी, सामाजिक प्रश्न आणि समस्यांवर विद्यार्थी आणि शिक्षकांची गटचर्चा असे वेगवेगळे उपक्रम असणार आहेत. या शिबिराचे पहाटे सहा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतचे प्रत्येक दिवसाचे वेळापत्रकही एआयसीटीईने आखून दिले आहे.

झाले काय?

  • अभियांत्रिकी, मूलभूत विज्ञान यातील विषयांबरोबरच आता कला, सहित्य, खेळ, योग, मूल्यशिक्षण यांचाही समावेश अभ्यासक्रमांत करण्यात आला आहे.
  • प्रथम वर्षांसाठी अभियांत्रिकीच्या विषयांची ओळख, मूलभूत विज्ञानातील विषय यांबरोबरच इंग्रजी विषयही बंधनकारक करण्यात आला आहे.
  • इंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रह, लेखन कौशल्ये, संभाषण कौशल्ये अशा घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

योग आणि संगीत

शारीरिक शिक्षण यापूर्वीही विद्यार्थ्यांना देण्यात येत होते. मात्र आता त्याच्या जोडीला योगाभ्यासही करावा लागणार आहे. त्याच्या तासिका पहाटे सहा वाजता घेण्याची सूचनाही या आराखडय़ात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संगीत, नृत्य, चित्रकला, वाद्यवादन, नाटय़ असा एखादा कला प्रकार निवडून त्याचाही अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागेल. मूल्यशिक्षणाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये परिसरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम, समाजसेवी संस्था यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी काम करणे अपेक्षित आहे. या विषयांचा अभ्यास पदवी मिळवण्यासाठी बंधनकारक असला तरीही त्यांसाठी स्वतंत्र श्रेयांक आणि त्या अनुषंगाने परीक्षा असणार नाही.

समाजाच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे. यादृष्टीने नवा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.   विद्यापीठे स्थानिक गरजा, परिस्थितीनुसार या आराखडय़ानुसार आपापला अभ्यासक्रम तयार करू शकतील. त्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्याला कोणतीही बाधा पोहोचणार नाही.’

डॉ. अनिल सहस्रबुद्धे, अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद